पुढारी वृत्तसेवा
श्रीमद्भगवद्गीता शिकवते की, माणसाने आपल्या यशाचा कधीही अहंकार बाळगू नये. अशी वृत्ती चुकीची मानली जाते. गीतेनुसार, कोणत्याही गोष्टीचा अहंकार माणसाला विनाशाच्या दिशेने घेऊन जातो.
ज्ञानाचा अहंकार
अनेकदा असे दिसून येते की, थोड्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर माणसामध्ये अहंकार निर्माण होतो. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण नेहमी नम्र राहण्यास सांगतात. माणसाने आपल्या ज्ञानाचा कधीही अभिमान बाळगू नये.
कारण एकदा का अहंकार आला की, ते ज्ञान फार काळ टिकत नाही. असे मानले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या बुद्धी किंवा ज्ञानामुळे अहंकारी बनते, तेव्हा तिच्या यशाचे मार्ग बंद होतात आणि तिच्या प्रगतीत अडथळे येतात.
सौंदर्याचा अहंकार
व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी तिने आपल्या शारीरिक सौंदर्याचा कधीही अभिमान बाळगू नये; कारण शरीर काळानुसार बदलत जाते आणि शेवटी नष्ट होते.
शारीरिक सौंदर्य केवळ काही काळासाठीच इतरांना प्रभावित करू शकते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जर तुमचे मन सुंदर असेल, तर त्याचा इतरांवर होणारा प्रभाव आयुष्यभर टिकून राहतो.
संपत्तीचा अहंकार
श्रीमद भगवद्गीतेत संपत्ती आणि मालमत्तेचा अभिमान बाळगण्याबाबत कडक इशारा देण्यात आला आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती तरुणपणी आपल्या संपत्तीचा बडेजाव मिरवतो, तो कालांतराने स्वतःच्याच अध:पतनाला निमंत्रण देतो.
पैशाचा अहंकार बाळगणे म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणूनच, कोणत्याही परिस्थितीत आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगू नये.