सावधान! प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिताय? संशोधनातून समोर आला नवा धोका

निलेश पोतदार

आजच्या धावपळीच्या जगात बाटलीबंद पाण्याला लोक सुरक्षित आणि शुद्ध समजून रोज पितात. मात्र नव्या संशोधनाने या धारणेवर प्रश्चचिन्ह उभे केले आहे.

संशोधनानुसार जे लोक रोज बाटलीबंद पाणी पितात. त्‍यांच्या शरीरात रोज जवळपास 90,000 अतिरिक्त मायक्रोप्लास्टीक कण पोहोचू शकतात.

मायक्रो प्लास्टीकचे कण खूप लहान असतात. जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे कण प्लॅस्टिक बाटल्या, पॅकेजिंग, भांडी अन्य प्लॅस्टिक उत्‍पादनातून निघून आपल्या पाणी आणि जेवणात मिसळू शकतात. जेंव्हा आपण असले पाणी पितो तेंव्हा ते कण आपल्या शरीरात जातात.

संशोधनात काय समोर आलं?

कॅनडातील Concordia University येथे झालेल्या संशोधनानुसार, बाटलीबंद पाणी पिणारे लोक नळाच्या पाण्यापेक्षा दरवर्षी सुमारे ९०,००० अधिक मायक्रोप्लास्टिक कण गिळतात. हे कण इतके सूक्ष्म असतात की आपल्याला कळतही नाही, पण प्रत्येक घोटासोबत ते शरीरात साचत जातात.

शरीरावर काय परिणाम होऊ शकतो?

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ मायक्रोप्लास्टिक शरीरात साचल्यास अनेक आरोग्य समस्यांशी त्याचा संबंध असू शकतो—जसे की शरीरातील दाह (सूज) वाढणे, हार्मोन्सचे असंतुलन, पेशींवर नकारात्मक परिणाम आणि रोगप्रतिकारक शक्तीवर (इम्यून सिस्टम) परिणाम. यावर अजून संशोधन सुरू आहे, पण सुरुवातीचे संकेत चिंताजनक आहेत.

‘Pure’ किंवा ‘Filtered’ लिहिलं असलं तरी धोका

‘Pure’ किंवा ‘Filtered’ असे लिहिलेले बाटलीबंद पाणी पूर्णपणे सुरक्षित असते असे अनेकांना वाटते. मात्र संशोधन सांगते की अशा पाण्यातही मायक्रोप्लास्टिक पूर्णपणे नष्ट होत नाहीत.

फक्त पाणीच नाही, या गोष्टीही धोका वाढवतात

मायक्रोप्लास्टिकचा स्रोत केवळ बाटलीबंद पाणी नाही. प्लास्टिक फूड पॅकेजिंग, प्लास्टिक कंटेनर, डिस्पोजेबल कप व बाटल्या, तसेच प्लास्टिकची भांडी—यांतूनही हे कण शरीरात जाऊ शकतात.

मायक्रोप्लास्टिकचा धोका कसा कमी कराल?

काही सोप्या बदलांनी मायक्रोप्लास्टिकचे सेवन बऱ्याच प्रमाणात कमी करता येते—

फिल्टर केलेले नळाचे पाणी प्या

प्लास्टिकऐवजी काच (Glass) किंवा स्टेनलेस स्टीलची बाटली वापरा

सिंगल-यूज प्लास्टिक टाळा

तुमच्या छोट्या सवयी, मोठा परिणाम

दररोजच्या छोट्या-छोट्या सवयी तुमच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणावरही मोठा परिणाम करतात. बाटलीबंद पाण्याऐवजी सुरक्षित पर्याय निवडून तुम्ही स्वतःला मायक्रोप्लास्टिकपासून वाचवू शकता आणि पर्यावरण संरक्षणातही हातभार लावू शकता.