पुढारी वृत्तसेवा
आपल्या अवतीभवती उमलणाऱ्या फुलांमध्ये चाफा आपल्या सौंदर्याने आणि मनमोहक सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
सहसा सुगंधी फुलांकडे फुलपाखरे आणि भुंगे आकर्षित होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, निसर्गाच्या या नियमाला चाफा अपवाद आहे.
तासन्तास बागेत फिरलात तरी तुम्हाला चाफ्याच्या फुलावर एकही भुंगा बसलेला दिसणार नाही.
तज्ज्ञांच्या मते, चाफ्याचे फूल दिसायला अत्यंत सुंदर आणि सुवासिक असले तरी त्यात परागकण नसतात.
भुंगे आणि मधमाश्या फुलांकडे मधासाठी आणि परागकणांसाठी जातात. चाफ्यामध्ये हा खाद्यसाठा नसल्यामुळे भ्रमर या फुलाकडे ढुंकूनही पाहात नाहीत.
फक्त भुंगेच नव्हे, तर मधमाश्या आणि गांधीलमाश्याही या फुलापासून लांब राहतात. जरी कीटक या फुलाकडे पाठ फिरवत असले, तरी मानवासाठी चाफा वरदान आहे.
वास्तुशास्त्रानुसार चाफ्याचे झाड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या फुलांपासून अत्तर आणि औषधी तेल बनवले जाते.
पाच विविध प्रकारांत आढळणारा चाफा कायम हिरवागार राहतो आणि पूजेमध्येही याला मानाचे स्थान आहे. निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे.