पुढारी वृत्तसेवा
जेम्स कॅमरून यांच्या 'Avatar' चित्रपटात दाखवलेले निळ्या-हिरव्या प्रकाशाने चमकणारे जंगल पाहून जगभरातील लोक थक्क झाले होते.
पण फार कमी लोकांना माहिती आहे की, असा नजारा भारतातील पश्चिम घाटात, विशेषतः गोवा आणि महाराष्ट्रातील काही जंगलांमध्ये पाहायला मिळू शकतो.
या प्रकाशाचे रहस्य काय?
या नैसर्गिक चमत्कारामागे कोणतीही जादू नसून, 'बायोल्युमिनेसन्स' नावाची शास्त्रीय प्रक्रिया आहे.
बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय?
ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये काही सजीव अंधारात स्वतःहून प्रकाश निर्माण करतात. पश्चिम घाटातील जंगलात पावसाळ्यात उगवणारे 'मायसेना' नावाचे अत्यंत छोटे मशरूम रात्रीच्या वेळी निऑन हिरवा प्रकाश सोडतात.
पावसाळ्यातील ओलावा आणि अनुकूल तापमान मिळाल्यावर हे मशरूम सक्रिय होतात आणि संपूर्ण जंगल एखाद्या परीकथेतील दृश्यासारखे दिसू लागते.
भारतात हे चमकणारे जंगल कुठे पाहता येईल?
जर तुम्हाला हा अद्भुत नजारा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असेल, तर तुम्हाला गोव्यातील 'भगवान महावीर वाइल्डलाईफ सँक्चुअरी' येथे जावे लागेल.
हे अभयारण्य गोव्याच्या दक्षिण-पूर्व भागात स्थित आहे. येथे पावसाळ्यात जंगलातील जमीन, झाडांची मुळे आणि पडलेली खोडे रात्रीच्या वेळी चमकू लागतात.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या काही भागांतही असा नजारा पाहायला मिळतो.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: जून ते ऑक्टोबर (पावसाळा).
मुसळधार पावसानंतरच्या रात्री या नजाऱ्यासाठी सर्वात योग्य असतात. अंधारात टॉर्चशिवाय जंगलात ही चमक अधिकच रहस्यमय वाटते.