Namdev Gharal
पुण्यापासून अगदी ७० किलोमिटरवर असलेला ताम्हिणी घाटातील अंधारबन (Andharban) जंगल ट्रेक हा महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक ट्रेकपैकी एक आहे.
'अंधारबन' या नावाचा अर्थ ' निबीड अंधारे जंगल' असा होतो. येथील जंगल इतके दाट आहे की दिवसासुद्धा सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे जंगलात अंधार असल्यासारखे वाटते.
हा ट्रेक महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात येतो. हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि कुंडलिका व्हॅलीच्या जवळ वसलेला आहे.
हा एक 'डाऊनहिल' (Downhill) ट्रेक आहे, म्हणजेच यात वर चढण्याऐवजी तुम्हाला डोंगरावरून खाली उतरायचे असते. ट्रेकची सुरुवात पिंपरी गावातून होते आणि शेवट भिरा धरणाजवळ होतो.
या जंगलातील झाडे-वेली इतकी दाट आहे की अनेक ठिकाणी दुपारच्या वेळीही सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही. जिथे फक्त अंधार आणि गूढ शांतता असते. हा वातावरणातील बदल प्रचंड थरारक वाटतो.
पावसाळ्यात हे जंगल धुक्याच्या दाट चादरीत हरवून जाते. काही वेळा समोरचे ५ फूट अंतरावरचेही दिसत नाही. अशा धुक्यातून आणि दाट झाडीतून रस्ता शोधत पुढे जाणे म्हणजे एखाद्या सस्पेन्स सिनेमासारखा अनुभव असतो.
अंधारबनमध्ये अनेक फाटे फुटलेले आहेत आणि घनदाट झाडीमुळे दिशा ओळखणे कठीण होते. त्यातच जंगलात मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब होते. आपण योग्य वाटेवर आहोत की नाही, ही धाकधूक ट्रेक संपेपर्यंत कायम राहते.
पावसाळ्यात अनेक छोटे मोठे प्रवाह पार करावे लागतात. पाण्याचा वेग आणि खोली वाढलेली असते. निसरड्या खडकांवरून, एकमेकांचे हात पकडून तो वेगवान पाण्याचा प्रवाह ओलांडताना ट्रेकर्सच्या काळजाचा ठोका चुकतो.
हे जंगल ताम्हिणी अभयारण्याचा भाग असल्याने येथे विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, आणि वनस्पती पाहायला मिळतात. नशीब असेल तर 'शेकरू' देखील पाहायला मिळू शकतो.
अंधारबन जंगलात जाण्यासाठी वनविभागाची (Forest Department) ऑनलाइन परवानगी काढणे आणि ठराविक शुल्क भरणे अनिवार्य आहे.
पावसाळ्यात अंधारबनमध्ये जळवा खूप मोठ्या प्रमाणावर असतात. पालापाचोळ्यातून चालताना त्या कधी पायाला चिटकतात आणि रक्त शोषून घेतात हे समजतही नाही.
या ट्रेकचे एकूण अंतर साधारणपणे १० ते १३ किलोमीटर आहे. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी अंदाजे ४ ते ५ तास लागतात.