Amla Remedies for Acidity: पित्ताचा त्रास होतोय? आवळ्याचे 'हे' आयुर्वेदिक उपाय १० मिनिटांत देतील आराम!

पुढारी वृत्तसेवा

पित्ताचा नेहमी त्रास जाणवणाऱ्यांनी मोरावळ्यात प्रवाळ भस्म व साजूक तूप, खडिसाखर घालून सात ते चौदा दिवस सकाळ संध्याकाळ घ्यावे.

नियमीत आम्लपित्ताचा त्रास ज्या लोकांना होतो, त्यांनी आवळकाठी (बिया काढून सुकविलेल्या आवळ्याच्या फोडी) चे चूर्ण, केळीचे कंदाचे रसातून तीन ते सात दिवस अनाशेपोटी प्रात:काळी घ्यावे.

पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी रात्रभर पाण्यात भिजलेली आवळकाठी, जीरे व लहानसा सुंठीचा तुकडा एकत्र वाटून अर्धा कप दुधासोबत पंधरा दिवस रोज सकाळी अनाशेपोटी घ्यावे.

अंगावर पित्ताच्या गांधी उटत असल्यास भिजलेली आवळकाठी बारीक वाटून सर्वांगास लेप करावा. तासाभराने स्नान करावे. अंगास साबण लावू नये.

पित्तशामक म्हणून आवल्याचा मुरंबा प्रसिद्ध आहे. मुरंबा करण्याची पद्धत अशी- चांगले पिकलेले, मोठे, न डागाळलेले १ किलो आवळे घ्यावेत.

लाकडी दांडक्याने चांगले चोचवून घ्यावेत. (आवळे चोचवण्यासाठी स्टीलची टोचणी घेतली तरी चालेल पण लोखंडी टोचणी वापरू नये. चोचवलेले आवळे चुन्याच्या पाण्यात बुडवून ठेवावेत.

त्यानंतर हे आवळे बाहेर काढून २ लिटर पाण्यात उकळून वाफवून घ्यावेत. हे वाफवलेले आवळे पाण्यातून बाहेर काढून फडक्याने कोरडे करून घ्यावेत.

२ किलो साखर किंवा खडीसाखरेच्या पक्क्या ३ तारी पाकात घालावेत व बरणीत भरून ठेवावेत हा आवळ्याचा मुरंबा २ ते ३ वर्ष टिकून राहतो.