Alang ship breaking yard : भारतातील हा किनारा म्हणजे जहाजांची जागतिक ‘स्मशानभूमी’!

Namdev Gharal

जगातील सर्वात मोठ्या जहाजांचा शेवटचा प्रवास हा भारतातील या समुद्रकिनाऱ्यावर होतो. हे आहे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग शिप ब्रेकिंग यार्ड (Alang Ship Breaking Yard)

जगातील एकूण जुन्या व निकामी जहाजांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के जहाजे एकट्या अलंगमध्ये तोडली जातात. खंबातच्या आखातात पसरलेला हा किनारा जुन्या जहाजांची जागतिक स्मशानभूमी म्हणून ओळखला जातो.

अलंगची निवड होण्यामागे मुख्य कारण म्हणजे येथील भौगोलिक रचना. येथे समुद्रात येणाऱ्या तीव्र भरती-ओहोटीमुळे १० ते १२ मीटर उंच लाटा निर्माण होतात, ज्यामुळे महाकाय जहाजे अगदी किनाऱ्यावरील चिखलात आणून उभी करणे सहज शक्य होते.

जहाजांमधून निघणारा स्टील आणि स्क्रॅप भारताच्या पुनर्वापर पोलाद उद्योगात प्रचंड मोठा वाटा उचलतो. देशातील अनेक लहान-मोठ्या बांधकाम प्रकल्पांसाठी अलंगमधून येणारा स्टील थेट वापरले जाते

भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' आणि 'आयएनएस विराट' यांसह जगातील सर्वात मोठे सुपरटँकर 'सीवाइज जायंट' (Seawise Giant) यासारखी दिग्गज जहाजे शेवटी अलंग येथेच भंगारात काढली गेली.

येथे केवळ लोखंड वेगळे केले जात नाही, तर जहाजावरील आलिशान फर्निचर, क्रॉकरी, जनरेटर्स, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेकोरेशनचे साहित्य काढले जाते. भावनगर-अलंग मार्गावर अशा वस्तूंची स्वतंत्र दुकाने थाटलेली असून तिथे हे सामान कवडीमोलाने विकत मिळते.

अलंग आणि लगतच्या परिसरात काम करणारे बहुतांश कामगार उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि झारखंडमधून आलेले आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून हे यार्ड सुमारे १ ते २ लाख लोकांना उपजीविका पुरवते.

पूर्वी अलंगमधील कामगारांच्या सुरक्षेवर व जहाजांमधील विषारी कचऱ्यावर (उदा. अ‍ॅस्बेस्टॉस) जागतिक स्तरावर बरीच टीका झाली होती. मात्र नंतर येथील ९०% पेक्षा अधिक प्लॉट्सने आंतरराष्ट्रीय हरित व सुरक्षित निकष पूर्ण केले आहेत.

अचूक मॅन्युअल कटिंग कौशल्य: जहाजांचे महाकाय सांगाडे अत्यंत सावधपणे वरून खाली या क्रमाने गॅस टॉर्चच्या साहाय्याने मानवी कौशल्याने कापले जातात, जेणेकरून जहाज असंतुलित होऊन पलटी होणार नाही.

अलंगमध्ये पहिले जहाज तोडण्याचे काम १९८३ मध्ये 'एम.व्ही. कोटा टेनझॉंग' (M.V. Kota Tenzong) या जहाजाने सुरू झाले होते; तेव्हापासून आजतागायत हजारो अजस्र जहाजांचे अस्तित्व येथे संपुष्टात आले आहे.