Airplane Fuel Capacity : विमानाची टाकी फुल्ल करायला किती इंधन लागतं?

पुढारी वृत्तसेवा

युद्धामुळे जगभरात तेलपुरवठ्यावर परिणाम होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत आणि अनेक देशांमध्ये टंचाईही निर्माण झाली आहे.

सामान्य माणूस दुचाकी किंवा मोटारीची टाकी फुल्ल करून काम भागवतो; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका विमानाची टाकी फुल्ल करण्यासाठी किती इंधन लागते?

हे प्रमाण दुचाकी-मोटारीपेक्षा कैकपट जास्त असते. जर आपण विमानाच्या टाकीबद्दल बोललो, तर लहान-मध्यम अंतराच्या फ्लाईटस्‌‍ जसे बोईंग 737 किंवा एअरबस ए-320 यांच्या टाकीत सुमारे 23,000 ते 27,000 लिटर इंधन भरले जाऊ शकते.

म्हणजेच, एक सामान्य देशांतर्गत उड्डाणासाठी 20,000 ते 25,000 लिटर इंधन पुरेसे असते; पण लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी परिस्थिती वेगळी असते.

जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान एअरबस ए-380 याची टाकी क्षमता सुमारे 3,20,00 लिटर (अंदाजे 84,500 गॅलन) आहे. एका विंगमध्येच इतके इंधन मावते की, ते शेकडो कारच्या टाक्यांइतके असते.

बोईंग 747-8 ची क्षमता सुमारे 2,38,000 लिटर आहे, तर जुन्या बोईंग 747-400 मध्ये सुमारे 2,16,000 लिटर इंधन बसते.

बोईंग 777 सारखे लांब पल्ल्याचे विमानही सुमारे 1,80,000 लिटरपर्यंत इंधन घेऊ शकते.

इंधनाचा वापर हा उड्डाणाचे अंतर, उंची, हवामान, वजन आणि प्रवाशांची संख्या यावर अवलंबून असतो.

एक मोठे विमान उड्डाण करताना तासाला सुमारे 5,000 ते 12,000 लिटर इंधन जाळू शकते.