२०२५ हे वर्ष ठरले ऐतिहासिक 'पहिल्या' विजयांचे साक्षीदार

पुढारी वृत्तसेवा

२०२५ हे वर्ष क्रीडा चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरले. या वर्षात अनेक ऐतिहासिक विजय पहायला मिळाले.

विविध खेळातील अनेक संघ दशकांपासून विजेतेपदाच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी अखेर त्यांचा विजेतेपदाचा 'दुष्काळ' संपवला.

ICC महिला क्रिकेट विश्वचषक :

नवी मुंबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. महिला क्रिकेटमधील दशकांच्या संघर्षाचे फळ या रूपाने टीम इंडियाला मिळले.

IPL 2025

१८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने (RCB) अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला हरवून आपले पहिले IPL विजेतेपद जिंकले.

ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) :

दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्स (लंडन) येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिले WTC विजेतेपद पटकावले. यासह त्यांनी १९९८ नंतरचे आपले पहिले मोठे ICC विजेतेपद जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला २७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.

हॅरी केन

इंग्लिश फुटबॉलपटू हॅरी केन याने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील १५ व्या हंगामात अखेर ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा संपवली. केन खेळत असलेल्या बायर्न म्युनिक संघाने यावर्षी बुंडेसलिगा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दशकाहून अधिक काळ सातत्याने उत्कृष्ट खेळ करूनही ट्रॉफीपासून वंचित राहिलेल्या केनसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा एक खूप मोठा आणि आनंदाचा क्षण होता.

UEFA युरोपा लीग 2025

टॉटेनहॅम हॉटस्पर संघाने मँचेस्टर युनायटेडला हरवून युरोपा लीग जिंकली. हा त्यांचा १७ वर्षांतील पहिला मोठा क्लब खिताब आणि ४१ वर्षांतील पहिला युरोपियन किताब ठरला.

बिग बॅश लीग (BBL)

या स्पर्धेच्या 14 व्या सीझनचे विजेतेपद होबार्ट हरिकेन्स संघाने पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी सिडनी थंडर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. हे त्यांचे BBL चे पहिलेवहिले विजेतेपद ठरले.

FA Cup Final 2025

क्रिस्टल पॅलेस संघाने त्यांच्या ११९ वर्षांच्या इतिहासातील सर्वात अविश्वसनीय अध्यायांपैकी एक पूर्ण केला. वेम्बली येथे झालेल्या एफए कप फायनलमध्ये त्यांनी बलाढ्य मँचेस्टर सिटी संघाचा १-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले!

UEFA चॅम्पियन्स लीग 2025 : पहिले UCL विजेतेपद

युरोपमधील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा 'चॅम्पियन्स लीग' मध्ये पॅरिस सेंट-जर्मेन संघाने (PSG) इंटर मिलानचा 5-0 असा दणदणीत पराभव करून आपले पहिले विजेतेपद पटकावले. या विजयासह, एकाच मोसमात 'कॉन्टिनेंटल त्रेबल' (Treble) जिंकणारा तो पहिला फ्रेंच क्लब ठरला.

EFL कप 2025

न्यूकॅसल युनायटेड एफसी संघाने लिव्हरपूलला हरवून ७० वर्षांनंतर पहिले मोठे देशांतर्गत विजेतेपद जिंकले, जे त्यांच्या चाहत्यांसाठी एक भावनिक क्षण होता.