पुढारी वृत्तसेवा
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात क्षुल्लक वादातून विद्यार्थ्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून जात असताना एका तरूणाच्या दुचाकीच्या हेडलाईटचा तीव्र प्रकाश झोत डोळ्यावर पडून झालेल्या वादात तीन तरूणांनी एका १८ वर्षाच्या तरूणाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या तरूणांनी धारदार हत्याराने सपासप वार करून या विद्यार्थ्याला जबर जखमी केले. या हल्ल्यात तरूणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोर त्रिकुटाचा शोध सुरू केला आहे.
आर्यन राजेश पनीकर (१८) असे हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडे असलेल्या दुर्गा माता मंदिर भागातील शक्तीधाम काॅम्पलेक्समध्ये राहणारा आहे. या संदर्भात जखमी आर्यनच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत कापसे, जयेश शिंदे आणि अवधुत राणे या तिघा हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोळसेवाडी परिसरातील रेल्वे क्वाॅर्टर भागात ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री आर्यन हा कोळसेवाडी भागातील रेल्वे क्वाॅर्टर भागात उभा होता. इतक्यात समोरून एक दुचाकी वेगाने येत होती. या दुचाकीच्या हेडलाईचा प्रखर झोत डोळ्यावर पडल्याने आर्यनचे डोळे दिपून गेले. दुचाकीवरून जाणाऱ्या तरूणाला आर्यन पनीकर याने थांबवून मला पाहून दुचाकीच्या दिव्याचा प्रखर झोत माझ्या डोळ्यावर का मारला ? असा जाब विचारला. आपण मुद्दाम प्रखर झोत मारला नाही. तो नैसर्गिक पध्दतीने पडल्याचे कारण सांगून तू मला विचारणारा कोण ? असा जाब दुचाकीस्वार प्रशांत कापसे याने आर्यन पनीकर याला विचारला. यावेळी दोघांत शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
या बाचाबाचीतून प्रशांत कापसे आणि त्याचे इतर दोन साथीदार जयेश शिंदे, अवधुत राणे यांनी आर्यनला ठोसा-बुक्क्याने मारहाण केली. एकावेळी तिघे मारहाण करू लागल्याने आर्यनला स्वत:चा बचाव करता आला नाही. याच दरम्यान प्रशांत कापसे याने कमरेला खोचलेल्या धारदार हत्याराने अचानक आर्यनवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आर्यनच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. आर्यनवर हल्ला केल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेले. जखमी आर्यनने दिलेल्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार फरार तिघा हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक वा. एम. धोंगडे अधिक तपास करत आहेत.