Premanand Maharaj: प्रेमविवाह करूनही नाती का तुटतात? प्रेमानंद महाराजांनी सांगितली चूक; म्हणाले, स्वतःच्या इच्छेने जोडीदार...

पुढारी वृत्तसेवा

Premanand Maharaj advice love marriage

वृंदावन : सध्याच्या काळात प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत असले, तरी अशा नात्यांमध्येही मतभेद, विश्वासघात आणि घटस्फोटाच्या घटना समोर येत आहेत. प्रेमातून एकत्र आलेल्या जोडप्यांचे नाते काही काळानंतर का तुटते, असा प्रश्न अनेकांना पडतो. याच मुद्द्यावर प्रेमानंद महाराजांनी आजच्या पिढीला नातेसंबंधांबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. स्वतःच्या इच्छेने जोडीदार निवडल्यानंतर नात्यात प्रामाणिकपणा आणि निष्ठा राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रेमविवाह केला, मग घटस्फोट का?

प्रेमविवाह केलेली जोडपीही पुढे एकमेकांची फसवणूक का करतात, असा प्रश्न प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले. त्यांच्या मते, प्रेमविवाहाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला तिच्यावरील खऱ्या प्रेमापोटी आपल्या आयुष्याचा भाग बनवणे हा आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात स्वतःच्या इच्छेने आयुष्यभरासाठी धरला जातो, तेव्हा प्रवासाच्या मध्यावर तिची साथ सोडणे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणे योग्य कसे ठरू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रेमविवाहानंतर घटस्फोट किंवा जोडीदाराची फसवणूक करण्याचा विचार करणे चुकीचे असल्याचे सांगत, अशा व्यक्तींनी स्वतःमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रेमानंद महाराज यांनी म्हटले आहे.

जुन्या काळातील नात्यांकडून घ्या शिकवण

आजच्या काळातील नात्यांची तुलना जुन्या काळातील वैवाहिक जीवनाशी करताना प्रेमानंद महाराज यांनी पूर्वीच्या नात्यांचे उदाहरण दिले. पूर्वी अनेकदा विवाहाच्या विधींदरम्यानच वधू-वर एकमेकांना पहिल्यांदा नीट पाहत असत. असे असूनही अनेक जोडपी आयुष्यभर एकमेकांची साथ देत आणि संसार सुखाने करत असत. त्यांचे कुटुंबही आनंदाने नांदत असे, असे त्यांनी सांगितले.

नात्यात प्रामाणिकपणा आणि धर्मपालन महत्त्वाचे

नाते टिकवण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यासोबत प्रामाणिकपणा, निष्ठा आणि योग्य आचरणही आवश्यक आहे, असा संदेश प्रेमानंद महाराज यांनी दिला. जर तुम्ही तुमच्या नात्यात धर्म आणि प्रामाणिकपणा जपला, तर कुटुंब नेहमीच आनंदी राहील. मात्र, जर तुम्ही चुकीचा मार्ग निवडला, तर ते नाते मोडकळीस येणे अटळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.