न्यूयॉर्क : पृथ्वीपासून 145 प्रकाशवर्षे दूर असलेला आणि एकेकाळी आपल्या सूर्यासारखा असलेला ‘LSPM J0207+3331’ हा तारा, सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी त्याचे इंधन संपल्यानंतर हळूहळू पांढरा बटू बनला. त्याची बाहेरील आवरणे गळून पडली आणि तो हळूहळू आक्रसून पांढर्या बटूच्या स्थितीत गेला. परंतु, एका नवीन शोधातून हे उघड झाले आहे की, हा ‘झोंबी तारा’ शांत होण्याऐवजी, एका खडकाळ ग्रहाचे अवशेष सक्रियपणे खात आहे. या घटनेमुळे या कल्पनेला बळ मिळते की, ग्रह प्रणाली त्यांच्या तार्याचा अंत झाल्यानंतरही दीर्घकाळ अस्थिर राहू शकतात.
ऑक्टोबर 2018 मध्ये ‘बॅकयार्ड वर्ल्डस् : प्लॅनेट 9’ या नागरिक-विज्ञान प्रकल्पात सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकाने या तार्याचा शोध लावला होता. ‘नासा’च्या वाईड-फील्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर (WISE) ने सर्वप्रथम LSPM J0207+3331 तार्याभोवती मध्य-अवरक्त प्रकाश पाहिला होता. यामुळे तार्याजवळ सिलिकेटने समृद्ध डेबि—स डिस्क असल्याचे उघड झाले. हे सिलिकेट तेच पदार्थ आहेत, जे ग्रहांच्या बाह्य कवचात आढळतात आणि यामुळेच तार्यामध्ये कोसळणार्या वस्तूचा पुरवठा होत असावा.
स्पेक्ट्रोस्कोपिक डेटाच्या मदतीने वैज्ञानिकांनी तार्याच्या वातावरणात जड मूलतत्त्वे म्हणजेच मॅग्नेशियम, लोह, सिलिकॉन आणि कोबाल्टसह 13 मूलतत्त्वांचे मिश्रण आढळले. ही मूलतत्त्वे पृथ्वीसारख्या खडकाळ ग्रहांमध्ये आढळतात. ही मूलतत्त्वे साधारणपणे तार्याच्या हायड्रोजनने भरलेल्या वरच्या भागात लवकर बुडून जातात, त्यामुळे पृष्ठभागावर त्यांची उपस्थिती दर्शवते की, ती नुकतीच जमा झाली आहेत. ट्रॉटियर इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एक्सोप्लॅनेटस्चे पॅट्रिक डुफोर यांनी स्पष्ट केले की, इतक्या जुन्या पांढर्या बटू तार्यासाठी खडकाळ पदार्थांची ही मात्रा असामान्यपणे जास्त आहे.
वैज्ञानिक अंदाजानुसार, तारा ज्या ग्रहासारख्या वस्तूचे अवशेष गिळत होता, तो कदाचित 120 मैल रुंद होता आणि तो तुकड्यांमध्ये तुटत होता. अशा घटना यापूर्वीही दिसल्या आहेत. परंतु, सुमारे 3 अब्ज वर्षांच्या वयानंतर हे घडणे बंद होईल, असे मानले जात होते. वैज्ञानिक मानतात की, 3 अब्ज वर्षांपासून हा तारा शांत होता; पण आता कशाने तरी या ‘झोंबी तार्याला’ पुन्हा जागृत केले आहे. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटचे जॉन डॅब्स यांना शंका आहे की, कदाचित एखादा मोठा वायू ग्रह अजूनही अस्तित्वात असेल.
हा ग्रह लहान वस्तूंना त्यांच्या कक्षेतून विचलित करून त्यांना तार्याकडे ढकलत असावा. हे बाहेरील ग्रह थंड आणि खूप दूर असल्यामुळे त्यांना थेट पाहणे अशक्य आहे. मात्र, ईएसएचे गैया मिशन या बटू तार्यामधील लहान हालचाली ओळखण्यास सक्षम असू शकते. या हालचाली अद़ृश्य ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतात. गैया मिशनचा पहिला डेटा डिसेंबर 2026 मध्ये जारी होणार आहे, ज्यामुळे या रहस्यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे.