वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर मानवी वसाहत विकसित करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाकडून संशोधन सुरू आहे. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मिती करण्यात 'नासा'ला यशही आले आहे. आता थेट मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू झाले आहेत. मंगळ ग्रहावर मनुष्य नेमका कुठे राहणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'नासा'च्या संशोधकांनी या जागेचा नकाशा शेअर केला आहे.
'नासा'कडून मंगळ ग्रहावर मानवासाठी सुरक्षित संभाव्य लँडिंग साईट शोधल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय मार्स आइस-मॅपिंग मिशनच्या मदतीने मंगळ ग्रहावरील संभाव्य लँडिंग साईटचे मॅपिंग करण्यात आले आहे. बर्फाळ प्रदेशात आइस कोरिंगच्या मदतीने मंगळ ग्रहावरील पाणी आणि बर्फ यांच्या मदतीने भविष्यातील मानवी मोहिमांसाठी मदत घेतली जाणार आहे. यासह मंगळ ग्रहावरील खडक आणि अन्य भू-सामग्री यांचे देखील परीक्षण केले जात आहे.
बर्फाळ प्रदेश तसेच मंगळ ग्रहावरील डोंगराळ प्रदेशात सखोल संशोधन करून भावी लँडिंग साईटच्या जागेचा अंदाजित नकाशा तयार करण्यात आला आहे. काँटेक्स्ट कॅमेरा आणि हाय रिझोल्यूशन इमेजिंग एक्सपिरिमेंट यांच्या मदतीने मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटवर मानवासाठी सुरक्षित लँडिंग साईटचा शोध घेण्यात आला आहे. मंगळाचे वातावरण पृथ्वीच्या तुलनेत बरेच विरळ आहे. मंगळाचा पृष्ठभाग पृथ्वीवरच्या जमिनीसारखाच आहे, त्यावर दगड, माती, डोंगर, दर्या आहेत आणि ही माती बर्याच प्रमाणात लोहयुक्त आहे. मंगळाचा लालसर रंग हा या लोहाच्या क्षारांमुळेच, गंजामुळेच आलेला आहे.
अद्यापही मंगळ ग्रहावर अनेक भूगर्भीय हालचाली घडत आहे. यामुळे मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करणे शक्य आहे का? याबाबत अचूक संशोधन करणे शक्य होणार आहे. मंगळ ग्रहावरील हे भूकंप उल्कापिंडांची टक्कर झाल्याने नाही तर टेक्टोनिक प्लेट यामुळे आले आहेत. मंगळ ग्रहावर टेक्टोनिक प्लेट अजूनही सक्रिय आहेत. 'इनसाईट लँडर'ने मंगळ ग्रहावर 1200 पेक्षा जास्त भूकंपाच्या नोंदी केल्या आहेत.