सेर्को पॉडच्या साहाय्याने प्रथमच इच्छामरण. Pudhari File Photo
विश्वसंचार

सेर्को पॉडच्या साहाय्याने प्रथमच इच्छामरण

पुढारी वृत्तसेवा

जीनिव्हाः ‘युथेनासिया’ म्हणजेच इच्छामरण असावे की नको, याबाबत अनेक देशांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र, दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या किंवा अन्य काही गंभीर कारणांमुळे शांतपणे मरू इच्छिणार्‍या लोकांसाठी काही देशांमध्ये रितसर कायदेही बनलेले आहेत. नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा, पोर्तुगाल, न्यूझीलंडसारख्या काही देशांमध्ये इच्छामरणाचा हक्क कायद्याने देण्यात आला आहे. मात्र, सेर्को पॉड या मशिनद्वारे मरण स्वीकारण्याची आता पहिलीच घटना घडली आहे. स्वित्झर्लंडमध्ये 64 वर्षांच्या एका महिलेने सेर्को मशिनद्वारे मृत्यूला कवटाळले.

महिलेने मशिनद्वारे मृत्यूला सामोरे जाण्यासाठीच गाठले स्वित्झर्लंड

अमेरिकेतून आलेल्या या महिलेने केवळ अशा मशिनद्वारे मृत्यूला सामोरे जाण्यासाठीच स्वित्झर्लंड गाठले होते. जर्मनीच्या सीमेवरील जंगलात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4.01 वाजता तिने मृत्यूला कवटाळले. या प्रकरणाची माहिती समजताच स्विस अधिकार्‍यांनी अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे. आयुष्य संपवण्यासाठी बनवण्यात आलेला हा सेर्को पॉड यापूर्वीही चर्चेत आलेला होता. ‘सर्कोफॅगस’ या इंग्रजी शब्दावरून त्याला हे नाव देण्यात आले आहे. त्याला संक्षेपात ‘सर्को’ असे म्हणतात. ‘सर्कोफॅगस’ म्हणजे दगडी शवपेटी. अशा शवपेट्यांचा वापर प्राचीन काळात इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये मृतदेह दफन करण्यासाठी केला जात असे. त्याला ‘पेगासस’ असेही म्हटले जाते. ‘सेर्को पॉड’ हे विमानतळावरील कॅप्सुलपेक्षाही आरामदायक दिसते. ते थ्रीडी प्रिंटर वापरून बनवलेले आहे. त्यामध्ये लिक्वीड म्हणजेच द्रवरूप नायट्रोजनचा डबा ठेवलेला असतो. त्यामधून निघणारा वायू हळूहळू माणसाला संपवतो. ही कॅप्सुल 2019 मध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आली होती. हे मशिन चालू केल्यावर ऑक्सिजन कमी होत जातो आणि नायट्रोजन वाढू लागतो. त्यामुळे आतील व्यक्तीला श्वास घेता येत नाही व त्याची प्राणज्योत मालवते. मृत्यूची इच्छा असणार्‍या व्यक्तीची प्रथम मनोवैज्ञानिक तपासणी केली जाते. झाकण लावल्यावर ज्यावेळी बटण दाबले जाते, तेव्हा पॉडमध्ये काही प्रश्नांची उत्तरे विचारली जातात. त्यांचे उत्तर मिळाल्यावर इच्छामरणाची प्रक्रिया सुरू होते. जर ही प्रक्रिया सुरू असताना व्यक्तीला जगण्याची इच्छा झाली, तर आतील इमर्जन्सी बटण दाबून व्यक्ती बाहेर येऊ शकते! मृत्यूच हवा असेल तर नायट्रोजन भरू लागल्यावर व्यक्ती बेशुद्ध पडते व पुढच्या दहा मिनिटांत तिचा मृत्यू होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT