नवी दिल्ली : खगोलशास्त्रज्ञांना आपल्या सूर्यमालेच्या दूरच्या भागात एका अज्ञात ग्रहाच्या संभाव्य अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल स्ट्रॉनॉमिकल सोसायटी : लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी ‘प्लॅनेट वाय’ नावाच्या एका गृहीत ग्रहाची कल्पना मांडली आहे. या ग्रहाच्या अस्तित्वाचे अनुमान काइपर बेल्ट मधील दूरच्या वस्तूंच्या कक्षांमध्ये दिसून आलेल्या अनपेक्षित कल पाहून काढण्यात आले आहे.
प्लॅनेट वाय प्रत्यक्षपणे पाहिला गेला नसला तरी, सुमारे 50 दूरच्या वस्तूंच्या कक्षांमध्ये आढळलेल्या असामान्य झुकावामुळे (टिल्ट) त्याचे अस्तित्व सूचित होते. या नवीन ग्रहाबद्दल बोलताना प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधक अमीर सिराज म्हणाले, हा एक अज्ञात ग्रह आहे, जो पृथ्वीपेक्षा लहान आणि बुध ग्रहापेक्षा मोठा असू शकतो आणि तो बाह्य सूर्यमालेत खोलवर परिभ्रमण करत आहे. नेपच्यूनच्या पलीकडे लपलेल्या ग्रहांची संकल्पना नवी नाही. परंतु ‘प्लॅनेट वाय’ हा पूर्वी प्रस्तावित केलेल्या ‘प्लॅनेट नाईन’ पेक्षा वेगळा आहे. ‘प्लॅनेट नाईन’चा वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 5 ते 10 पट जास्त असण्याची शक्यता आहे आणि तो अधिक दूर आहे.
सूर्य आणि पृथ्वीच्या अंतराच्या सुमारे 80 पट पलीकडे, कक्षांमध्ये 15 अंशांचा झुकाव आढळला आहे. एखादा जवळून जाणारा तारा किंवा प्रमाणित ग्रह निर्मिती मॉडेल्स या बदलाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असे सिराज यांच्या टीमने म्हटले आहे. या टीमने केलेल्या संगणकीय सिम्युलेशननुसार, सध्याची मॉडेल्स, प्लॅनेट नाईनसह, या झुकावासाठी जबाबदार नाहीत. त्यांच्या अंदाजानुसार, प्लॅनेट वाय हा बुध आणि पृथ्वीच्या वस्तुमानादरम्यानचा ग्रह असून तो सूर्य-पृथ्वीच्या अंतराच्या 100 ते 200 पट दूर परिभ्रमण करत असण्याची शक्यता आहे. तसेच, ज्ञात ग्रहांच्या तुलनेत त्याच्या कक्षेत किमान 10 अंशांचा झुकाव आहे.
हा शोध ‘प्लॅनेट वाय’चे अस्तित्व सिद्ध करत नसला तरी, सिराज यांच्या मते या 50 वस्तूंच्या आकडेवारीचे महत्त्व 96 टक्के ते 98 टक्के इतके आहे. चिलीमधील ‘वेरा सी. रुबिन वेधशाळा’ या वर्षाच्या अखेरीस 10 वर्षांचे सर्वेक्षण सुरू करेल. जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा असलेले हे दुर्बिण दर तीन दिवसांनी संपूर्ण आकाशाचे स्कॅन करेल आणि प्लॅनेट वायच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा देऊ शकेल, असे संशोधकांचे मत आहे.