वेलिंग्टन : कल्पना करा, संसदेचे सभागृह... एक महिला खासदार व्यासपीठावर उभ्या आहेत. अचानक त्यांचे डोळे मोठे होतात, जीभ बाहेर काढून त्या गर्जना करू लागतात आणि त्यांचे संपूर्ण शरीर थरथरून नाचू लागते. हे काही नाटकाचे दृश्य नाही, तर न्यूझीलंडच्या संसदेतील खरी घटना आहे, जी पाहून तुमचाही थरकाप उडेल. न्यूझीलंडच्या संसदेत पुन्हा एकदा पारंपरिक माओरी नृत्य ‘हाका’ पाहायला मिळाले. माओरी पक्षाच्या नवीन खासदार ओरिनी कापारा यांच्या पहिल्या भाषणानंतर ही घटना घडली. ओरिनी कापारा सप्टेंबरमध्ये तामाकी मकुराऊ मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
गुरुवारी त्यांनी संसदेत त्यांचे पहिले भाषण पूर्णपणे माओरी भाषेत सुरू केले. ‘मी पूर्वी गोष्टी कव्हर केल्या, आता त्या बदलून दाखवेन,’ असे त्या म्हणाल्या. भाषणात त्यांनी माओरी लोकांचा लवचिकपणा, त्यांची भाषा, कला आणि परंपरा यावर जोर दिला. ओरिनी यांचे भाषण संपताच सभागृहात मंजूर असलेले गीत (वायटा - Waita) गायले गेले. पण त्याच क्षणी पब्लिक गॅलरीतून एका व्यक्तीने हाका नृत्याची सुरुवात केली आणि पाहता पाहता बाकी लोकही या नृत्यात सामील झाले. ओरिनी कापारा देखील डोळे मिचकावत, जीभ बाहेर काढत आणि जोरात ओरडत या नृत्यात सामील झाल्या. काही इतर खासदारांनीही यात सहभाग घेतला.
हे दृश्य इतके जोरदार होते की संपूर्ण सभागृह थरारले. आपल्या खुर्चीवर बसलेले स्पीकर बाऊनली तातडीने उभे राहिले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला, त्यांच्या मानेच्या नसा फुगल्या होत्या. ते माईक पकडून ओरडले, ‘नाही, असे करू नका. हे होणार नाही, याची हमी दिली होती!’ पण हाकाचा जोश काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. अखेरीस, स्पीकर बाऊनली यांनी सत्र स्थगित घोषित केले. नंतर त्यांनी या घटनेला ‘अपमानजनक’ असल्याचे म्हटले. हाका हे माओरी संस्कृतीचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हाका हे पूर्वी युद्धात जाण्यापूर्वी लढवय्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शत्रूला घाबरवण्यासाठी किंवा महत्त्वाच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी केले जात असे.
आजकाल न्यूझीलंडची रग्बी टीम ‘ऑल ब्लॅक्स’ सामन्यापूर्वी हे नृत्य करते, ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले आहे. मात्र, संसदेत हाका करणे हे बंडखोरी करण्यासारखे आहे. माओरी पार्टी अनेकदा अशा नृत्यांच्या माध्यमातून आदिवासी अभिमान व्यक्त करते आणि वसाहतवादी नियमांना आव्हान देते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही तीन माओरी खासदारांनी एका वादग््रास्त विधेयकावर हाका नृत्य केले होते. ते विधेयक 1840 च्या वेटांगी कराराला (बिटिश आणि माओरी यांच्यातील सुरक्षा करार) पुन्हा वाचण्याबद्दल होते. त्यावेळी त्या तिघांनाही दीर्घकाळासाठी निलंबित करण्यात आले होते.