विविध प्राण्यांमध्ये स्वसंरक्षणाचे वेगवेगळे तंत्र असते. यापैकीच एक खास संरक्षण यंत्रणा म्हणजे बॉल म्हणजेच चेंडू बनून गडगडणे. काही प्राणी शिकारीपासून वाचण्यासाठी किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे गोल गोळ्यासारखे होतात आणि गडगडायला लागतात. हे तंत्र त्यांना संकटाच्या वेळी त्यांच्या कोमल अवयवांना सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तसेच, हे नैसर्गिक कवच त्यांना स्थलांतर शक्य नसताना हवामानातील बदलांच्या तडाख्यापासूनही वाचवते. चला, अशा काही प्राण्यांविषयी जाणून घेऊया ज्यांच्याकडे ही अनोखी आत्म-संरक्षण प्रणाली आहे.
आर्माडिलो :
चेंडू बनणार्या प्राण्यांचा विचार केल्यास, सर्वप्रथम नाव आठवते ते म्हणजे आर्माडिलो. हे प्राणी शिकारीपासून वाचण्यासाठी पूर्णपणे त्यांच्या शरीरावरील कवचावर अवलंबून असतात. स्वतःला कठोर कवचात घट्ट बंद करून बॉल बनून गडगडण्याची क्षमता हा त्यांच्या आत्मसंरक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. हे प्राणी मूळचे अमेरिकन खंडातील आहेत. ते दिसायला गोंडस आणि कवचधारी सस्तन प्राणी आहेत. अमेरिकेत त्यांच्या 21 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.
पँगोलिन (खवले मांजर, मुंगीखाऊ)
पँगोलिन हे आशिया आणि आफ्रिकेत आढळणारे मूळचे रहिवासी आहेत. त्यांना ‘स्केली अँटईटर’ या नावानेही ओळखले जाते. बर्याचदा लोक त्यांना आर्माडिलो समजतात, पण ते पूर्णपणे वेगळे आहेत. हे प्राणी मुंग्या खाणारे कवचधारी सस्तन असून त्यांच्या शरीरावर धारदार खवले असतात, ज्यामुळे त्यांना नैसर्गिक सुरक्षा मिळते. संकट आल्यावर ते बर्याचदा आपल्या शेपटीने चेहरा झाकून घेतात आणि चेंडू बनून गडगडतात. विशेष म्हणजे, त्यांचे खवले केराटिन नावाच्या पदार्थापासून बनलेले असतात. हाच पदार्थ मानवांच्या नखांमध्ये आढळतो.
हेजहॉग :
हेजहॉग हे लहान आकाराचे सस्तन प्राणी आहेत. ते साळिंदरच्या पिल्लांसारखे दिसतात. ते आशिया, न्यूझीलंड, युरोप आणि आफ्रिकेत आढळतात, जिथे त्यांच्या 17 प्रजाती आहेत. त्यांचे धारदार काटे देखील केराटिनचे बनलेले असतात. जेव्हा ते गोल चेंडूसारखे बनतात, तेव्हा त्यांचे हे टोकदार काटे अधिक बाहेर येतात. या दरम्यान, ते अनेकदा बॉल बनून शिकारीवरच हल्ला करतात.
पिल मिलिपीड :
पिल मिलिपीड ही जगभर आढळणारी एक सामान्य प्रजाती आहे. यांचे शरीर इतर मिलिपीडस्च्या तुलनेत लहान असते आणि अनेक भागांमध्ये विभागलेले असते. ते वरून गोलाकार आणि खालून चपटे असतात. इतर जीव त्रास देऊ लागल्यास, ते स्वतःला एका लहान, कठीण गोळ्याप्रमाणे गोल करतात. यामुळे त्यांच्या शरीराचा कठोर बाहेरील भाग त्यांच्या संरक्षणासाठी उपयोगी पडतो.