वॉशिंग्टन : पाश्चात्त्य देशांमध्ये सध्या हॅलोविन उत्सवाचे वातावरण आहे. भुतेखेते, भयावह चेहर्यांचे मुखवटे घालून यावेळी मुलं फिरत असतात. असा ‘हॉरर सीझन’ साजरा करण्यासाठी, ‘नासा’ ने नुकताच चाडमधील एका मोठ्या ज्वालामुखीच्या खड्ड्याच्या मध्यभागी अंतराळाकडे पाहत असल्यासारखा भासणारा एका भयानक ‘कवटी’चा फोटो प्रसिद्ध केला आहे.
हा अनोखा फोटो 12 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील एका अंतराळवीराने टिपला. अंतराळयान सहारा वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या टिबेस्टी मॅसिफ पर्वतरांगेवरून जात असताना हा देखावा कॅमेर्यात कैद झाला. ‘नासा’च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने हा फोटो 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केला. कवटीच्या आकाराचे हे भूवैशिष्ट्य ‘ट्रौ औ नॅट्रॉन’ किंवा ‘डून ओरेई’ नावाच्या ज्वालामुखीच्या खड्ड्याच्या तळाशी आहे.
हा खड्डा सुमारे 1,000 मीटर (3,300 फूट) रुंद आहे. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या एका प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हे विवर तयार झाले. फ्रेंचमध्ये ‘ट्रौ औ नॅट्रॉन’ चा अर्थ ‘नॅट्रॉनचा खड्डा’ तर ‘डून ओरेई’ म्हणजे ‘मोठा खड्डा’ असा होतो. कवटीसारख्या दिसणार्या या भागाचा रंग आणि आकार तिथल्या भूवैज्ञानिक रचनेमुळे आला आहे : तोंडाचा, नाकाचा आणि डाव्या गालाचा पांढरा रंग हा नॅट्रॉन नावाच्या नैसर्गिक खारट मिश्रणामुळे (सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, मीठ आणि सोडियम सल्फेट) आला आहे. डोळ्यांचा आणि नाकाच्या छिद्रांचा भाग सिंडर कोन्स (Cinder Cones) आहेत.
हे ज्वालामुखीच्या वाफा बाहेर पडण्याच्या ठिकाणाभोवती तयार झालेल्या उंच शंकूच्या आकाराच्या टेकड्या आहेत. चेहर्याच्या डावीकडील गडद भाग हा खड्ड्याच्या उंच कड्याची पडलेली सावली आहे, ज्यामुळे या कवटीला त्याचा विशिष्ट आकार मिळाला आहे. सध्या ट्रौ औ नॅट्रॉन हा भाग पूर्णपणे निर्जन आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, सुमारे 14,000 वर्षांपूर्वीपर्यंत येथे एक मोठे हिमनदीचे तळे अस्तित्वात होते. 1960 च्या दशकात, संशोधकांना खड्ड्याच्या नॅट्रॉनने आच्छादलेल्या तळाखाली समुद्री गोगलगायी आणि प्लँक्टनचे जीवाश्म सापडले होते. तर 2015 मध्ये झालेल्या एका मोहिमेत 1,20,000 वर्षांपूर्वीचे शैवाल जीवाश्म आढळले होते.