चीनमध्ये ‘एआय’च्या मदतीने रोबोटस् खेळले फुटबॉलची मॅच Pudhari File Photo
विश्वसंचार

Robots Play Football | चीनमध्ये ‘एआय’च्या मदतीने रोबोटस् खेळले फुटबॉलची मॅच

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनच्या पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने गेल्या काही वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघाचे चाहतेदेखील निराश झाले आहेत. या निराशेच्या गर्तेत आता मैदानावर उतरलेल्या ह्युमनॉईड रोबोटस्च्या (मानवासारखे दिसणारे रोबोट) संघाने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. बीजिंगमध्ये नुकताच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणारा, पूर्णपणे स्वायत्त असा रोबोट फुटबॉल सामना पार पडला, ज्याची चर्चा खेळापेक्षा त्यातील तंत्रज्ञानामुळे अधिक होत आहे.

चीनच्या राजधानीत प्रथमच आयोजित या स्पर्धेत चार ह्युमनॉईड रोबोट संघांनी 3-विरुद्ध-3 सामने खेळले. हे सामने आगामी ‘वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्स’ची एक झलक मानली जात आहेत. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात मानवी हस्तक्षेप अजिबात नव्हता; सर्व रोबोटस् केवळ एआयच्या मदतीने स्वतःचे निर्णय घेत होते आणि रणनीती आखत होते. या रोबोटस्मध्ये प्रगत व्हिज्युअल सेन्सर्स बसवण्यात आले होते, ज्यामुळे ते चेंडू ओळखू शकत होते आणि मैदानात वेगाने हालचाल करू शकत होते. पडल्यानंतर स्वतःहून उभे राहण्याची क्षमताही त्यांच्यात होती. तरीही, सामन्यादरम्यान काही रोबोटस्ना स्ट्रेचरवरून बाहेर घेऊन जावे लागले, ज्यामुळे या अनुभवाला एक वेगळाच वास्तववादी स्पर्श मिळाला.

चीन सध्या ‘एआय’ शक्तीवर चालणार्‍या ह्युमनॉईड रोबोटस्च्या विकासावर भर देत आहे. फुटबॉल, मॅरेथॉन आणि बॉक्सिंग यांसारख्या स्पर्धांचा वापर त्यांच्या चाचणीसाठी केला जात आहे. रोबोट पुरवणार्‍या कंपनीच्या मते, भविष्यात माणसे आणि रोबोटस् एकत्र खेळू शकतील, यासाठी त्यांची सुरक्षितता तपासणे महत्त्वाचे आहे. अंतिम सामन्यात त्सिंगहुआ विद्यापीठाच्या संघाने चायना अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संघाचा 5-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. एकीकडे मानवी संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असताना, दुसरीकडे या रोबोटस्च्या खेळाने मात्र चाहत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT