पेशीतील जनुके नियंत्रित करण्याचा प्रभावी उपाय. Pudhari File Photo
विश्वसंचार

प्रकाशाच्या साहाय्याने जनुकात अचूक बदल शक्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगभरात जीन्स म्हणजेच जनुकांबाबतही वेगवेगळे संशोधन होत असते. जनुक संपादनातील प्रकाशाचा वापर करण्याची एक वेगळी पद्धतही वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. त्यामध्ये जनुकांचे संपादन अधिक अचूक पद्धतीने करता येते. पेशीतील जनुके नियंत्रित करण्याचा हा प्रभावी उपाय सापडला असल्याचे अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठातील संशोधक अ‍ॅलेक्झांडर डेटर्स यांनी म्हटलेले आहे.

लायसिन या अमायनो आम्लाचे अवशेष कॅस-9 मध्ये आढळले

या नवीन पद्धतीमुळे जनुकाचे पेशीतील स्थान व वेळ ठरवता येते. त्यामुळे एखादा जनुक अचूकतेने काढूनही टाकता येतो. सीआरआयएसपीआर -कॅस-9 या जनुक संपादन साधनाचा शोध 2013 मध्ये लावण्यात आला होता. या पद्धतीत जीवाणूपासून मिळवलेले कॅस-9 हे प्रथिन व आरएनएची कृत्रिम मार्गदर्शक व्यवस्था जिनोममध्ये काप घेऊन जनुकाची दुरुस्ती करू शकते किंवा अपेक्षित उत्परिवर्तने म्हणजे म्युटेशन्स आणू शकते. प्रत्यक्षात सीआरआयएसपीआर (क्लस्टर्ड रेग्युलरसली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅल्रिडॉमिक रिपीटस ऑफ डीएनए बेस सिक्वेन्सेस) ही पद्धत सिस्टीक फायब्राॅसिस व सिकल सेल अ‍ॅनिमिया या रोगांवर बरीचशी परिणामकारक ठरली आहे. प्रयोगशाळेत माणसाला होणारे रोग प्राण्यांमध्ये निर्माण करून त्यांच्यावर प्रयोग करण्यात आले आहेत. कीटकांना दाद न देणार्‍या गव्हाच्या प्रजातीही तयार करणे शक्य झाले आहे. नवीन अभ्यासानुसार संशोधकांना लायसिन या अमायनो आम्लाचे अवशेष कॅस-9 मध्ये आढळून आले आहेत. आताच्या नवीन प्रयोगात कॅस-9 प्रथिनाला जैविकदृष्ट्या निष्क्रिय करता येते, जैविक पिंजर्‍यात बंदिस्त करून ठेवता येते व प्रकाशाच्या मदतीने तो पिंजरा उघडता येतो. पिंजरा उघडेपर्यंत काही विकरांना कृतिशील करता येते शिवाय जनुकीय संपादन करता येते. पूर्वी कॅस-9 चे काम नियंत्रित करणे अवघड होते. कॅस-9 वर प्रकाशाचा झोत सोडून अधिक चांगल्या प्रकारे जनुकीय संपादन करता येते. अमुक पेशीत अमुक वेळी जनुकात बदल करायचा आहे तर ते आता शक्य आहे, असे डेटर्स यांनी म्हटले आहे. हा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ द अमेरिकेन केमिकल सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT