वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी एक नवीन आणि प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले आहे, एक मऊ रोबोटिक ‘डोळा’, जो कोणत्याही बाह्य ऊर्जेचा वापर न करता प्रकाशाला प्रतिसाद देऊन आपोआप फोकस करू शकतो. ही अत्यंत शक्तिशाली रोबोटिक लेन्स इतकी संवेदनशील आहे की, ती मुंगीच्या पायावरील केस किंवा परागकणाचे कप्पे यांसारखे अगदी बारीक तपशीलही ओळखू शकते.
या लेन्समुळे भविष्यात ‘सॉफ्ट रोबोटस्’ तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल, ज्यांना त्यांची द़ृष्टी टिकवून ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स किंवा बॅटरीची गरज भासणार नाही. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बायोमेडिकल अभियांत्रिकीचे डॉक्टरेट विद्यार्थी आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक कोरी झेंग यांनी सांगितले की, सॉफ्ट रोबोटिक्सचा उपयोग अनेक वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्समध्ये होऊ शकतो. जसे की, मानवी शरीरात समाकलित होणारी परिधानयोग्य तंत्रज्ञान किंवा खडबडीत/धोकादायक ठिकाणी काम करू शकणारी स्वयंचलित उपकरणे. पारंपरिक, विजेवर चालणारे रोबो जग पाहण्यासाठी कडक सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरतात.
पण झेंग यांच्या म्हणण्यानुसार, ‘जर तुम्ही मऊ, बुळबुळीत, आणि कदाचित वीज न वापरणार्या रोबोटस्कडे पाहत असाल, तर तुम्हाला अशा रोबोटस्मध्ये सेन्सिंग कसे करायचे याचा विचार करावा लागेल. ‘हा नवीन रोबोटिक डोळा हायड्रोजेल नावाच्या पदार्थापासून बनलेला आहे. हायड्रोजेलमध्ये पॉलीमरची चौकट असते, जी पाणी शोषून घेते आणि सोडते. यामुळे हे जेल अधिक पातळ किंवा अधिक घट्ट अवस्थेत बदलू शकते. या विशिष्ट लेन्समध्ये, हायड्रोजेल उष्णता मिळाल्यावर पाणी सोडून आकसते आणि थंड झाल्यावर पाणी शोषून फुगते. संशोधकांनी सिलिकॉन पॉलीमर लेन्सच्या भोवती हायड्रोजेलचे एक कडे तयार केले आणि संपूर्ण डोळ्यासारखी रचना एका मोठ्या चौकटीत बसवली. झेंग यांनी स्पष्ट केले की, याची यांत्रिक रचना मानवी डोळ्याच्या संरचनेसारखीच आहे.
या हायड्रोजेलमध्ये ग्रॅफीन ऑक्साईडचे लहान कण मिसळलेले आहेत, जे गडद रंगाचे असल्याने प्रकाश शोषून घेतात. जेव्हा सूर्यप्रकाशाच्या तीव—तेचा प्रकाश ग्रॅफीन ऑक्साईडवर पडतो, तेव्हा हे कण गरम होतात आणि हायड्रोजेलला उष्णता देतात. हायड्रोजेल आकसते आणि ताणले जाते, ज्यामुळे लेन्स ओढली जाते आणि ती फोकस होते. जेव्हा प्रकाशाचा स्रोत दूर केला जातो, तेव्हा हायड्रोजेल फुगते आणि लेन्सवरील ताण सोडला जातो. हे हायड्रोजेल प्रकाशाच्या संपूर्ण द़ृश्यमान स्पेक्ट्रमला प्रतिसाद देते.
‘सायन्स रोबोटिक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन शोधनिबंधात, झेंग आणि त्यांच्या डॉक्टरेट सल्लागार शू जिया यांनी सिद्ध केले की, ही लेन्स पारंपरिक लाईट मायक्रोस्कोपमधील काचेच्या लेन्सऐवजी वापरली जाऊ शकते आणि ती अतिशय लहान तपशील ओळखू शकते. उदाहरणार्थ, या लेन्सने गोचीडच्या नखांमधील 4 - मायक्रोमीटरची गॅप, बुरशीचे 5- मायक्रोमीटरचे तंतू आणि मुंगीच्या पायावरील 9- मायक्रोमीटरचे खुंटलेले केसदेखील स्पष्टपणे पाहिले.