जॉजिया : कार अति वेगाने चालवली, यावरून 5 हजार ते 10 हजारांचा दंड झाल्याचे अनेक किस्से आपण पाहिले असतील; पण अमेरिकेतील एका व्यक्तीला अतिवेगाने कार चालवल्याबद्दल थोडाथोडका नव्हे तर चक्क साडेसहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. याविरोधात त्या व्यक्तीने पुढे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; पण न्यायालयाने देखील पोलिसांची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा दिला.
जॉर्जिया येथील कॉनर कैटो हा 2 सप्टेंबर रोजी सवानामार्गे आपल्या घरी परतत होता. यादरम्यान प्रवासात त्याला पोलिसांनी प्रतितास 145 कि.मी. वेगाने कार चालवत असताना रंगेहाथ पकडले. तेथे 90 किलोमीटर्स प्रतितास इतक्याच वेगाला मान्यता होती. कॉनरला आता आपल्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, हे लक्षात आले. पण घरी पोहोचल्यानंतर त्याला दंडाची रक्कम कळाली, त्यावेळी त्याच्या पायखालची वाळूच सरकली! कारण, पोलिसांनी त्याला थोडीथोडकी नव्हे तर चक्क 6.5 कोटी रुपये इतकी रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली.
प्रारंभी, ही टायपिंगची चूक असेल, असे वाटल्याने त्याने कॉल सेंटरशी संपर्क साधला; पण दंडाचा आकडा बरोबर असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्याला आणखी एक धक्का बसला. एक तरी 21 डिसेंबरपर्यंत दंड भरावा लागेल. किंवा न्यायालयात समक्ष हजर राहावे लागेल, असे त्याला यावेळी सांगण्यात आले.
इतका मोठा दंड का आकारण्यात आला, याची कारणमीमांसाही येथे करण्यात आली. अमेरिकेतील ऑटोमेटिक सॉफ्टवेअर सुपर स्पीडर्सने हा वेग पकडला आणि त्याच माध्यमातून दंडाची रक्कमही निश्चित केली गेली. अमेरिकेत कमाल वेगमर्यादपेक्षा किती अधिक फरकाने ड्रायव्हिंग केले, यावरून दंड रक्कम ठरते. त्याचा कॉनर कैटोला येथे फटका बसल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी फिनलंडमधील एका व्यावसायिकाला देखील वेगमर्यादा न पाळल्याने 6 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. एंडर्स विक्लोफ असे त्या 76 वर्षीय व्यावसायिकाचे नाव आहे. वाहतूक विभागाने त्यावेळी दहा दिवसांकरिता त्यांचा परवानाही रद्द केला होता.