लंडन : गणिताची भीती अनेकांना वाटते, पण आता यावर एक अनोखा उपाय सापडण्याची शक्यता आहे. मेंदूला अत्यंत सूक्ष्म आणि न जाणवणार्या विद्युत लहरी (Electrical Signals) देऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता लक्षणीयरीत्या सुधारता येते, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान लवकरच घरगुती वापरासाठीही उपलब्ध होऊ शकतं, असा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, यावर अधिक सखोल संशोधन होण्याची गरज आहे.
या अभ्यासासाठी, ऑक्सफर्ड विद्यापीठातील 72 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. सुरुवातीला, या विद्यार्थ्यांची गणित विषयातील क्षमता तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर, त्यांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटात गणित कच्चे आणि पक्के असणार्या विद्यार्थ्यांचे समान मिश्रण होते. प्रयोगादरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्याच्या त्वचेवर (टाळूवर) इलेक्ट्रोडस् बसवण्यात आले, ज्याद्वारे मेंदूला सौम्य विद्युत लहरी पाठवता येत होत्या. पहिल्या दोन गटांतील विद्यार्थ्यांच्या मेंदूतील ‘डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ (dlPFC) आणि ‘पोस्टरियर पॅरिएटल कॉर्टेक्स’ (PPC) या भागांना उत्तेजित करण्यात आले.
पूर्वीच्या संशोधनानुसार, मेंदूचे हे दोन्ही भाग गणिताच्या क्षमतेशी जोडलेले आहेत. तिसर्या गटाला मात्र कोणतीही खरी उत्तेजना न देता, केवळ उत्तेजना दिल्याचा आभास (Sham Stimulation) निर्माण करण्यात आला. या प्रयोगासाठी संशोधकांनी ‘ट्रान्सक्रेनियल रँडम नॉइज स्टिम्युलेशन’ (tRNS) या तंत्रज्ञानाचा वापर केला. मेंदूला इजा न करता बाहेरून उत्तेजित करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण त्यापैकी tRNS हे तंत्रज्ञान अधिक आरामदायक मानले जाते. या प्रक्रियेत त्वचेतून जाणारा विद्युतप्रवाह इतका कमी असतो की तो जाणवतही नाही. या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि सरे विद्यापीठातील न्यूरोसायंटिस्ट, रोई कोहेन कडोष यांनी सांगितले की, ‘बहुतेक लोकांना उत्तेजना दिली जात आहे की नाही, हे कळतसुद्धा नाही.’
ज्या गटांना खरोखरच विद्युत लहरी देण्यात आल्या, त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला पाच दिवसांत एकूण 150 मिनिटे ही उत्तेजना देण्यात आली. या काळात त्यांच्याकडून गणिताच्या चाचण्याही सोडवून घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांचे ‘गणना कौशल्य’ (Calculation Skills) आणि ‘पाठांतर क्षमता’ (Drill Learning) तपासण्यात आली. गणना कौशल्यात, विद्यार्थ्यांना गणिताचे नियम वापरून उदाहरणे सोडवायची होती. तर पाठांतर क्षमतेत, त्यांना गणिताचे नियम न वापरता केवळ दिलेली समीकरणे लक्षात ठेवून ती पुन्हा सांगायची होती. या प्रयोगाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, ज्या विद्यार्थ्यांना मेंदूला विद्युत लहरी मिळाल्या, त्यांची गणना आणि पाठांतर या दोन्ही क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली.