विश्वसंचार

नैसर्गिक तारांगण असलेले जपानचे ज्वालामुखीचे बेट 

Pudhari News

टोकियो : अवकाश निरीक्षण करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी तारांगण (प्लॅनेटोरियम) बनवण्यात आली आहेत. भारतातही अशी तारांगणे आहेत जेथून हौशी खगोल संशोधकही आकाशात लपलेली रहस्ये शोधत असतात. मात्र, जगाच्या पाठीवर एक असेही नैसर्गिक तारांगण आहे जे चक्‍क ज्वालामुखीच्या बेटाच्या स्वरूपात आहे. जपानच्या या बेटावरून अवकाश निरीक्षण करणे सहज सोपे होते.

या बेटाचे नाव आहे आओगाशिमा. फिलिपीन समुद्रात असलेल्या या बेटाचे क्षेत्रफळ 8.75 चौरस किलोमीटर आहे. जपानची राजधानी टोकियोपासून ते दक्षिणेला 358 किलोमीटरवर आहे. विशेष म्हणजे या ज्वालामुखीच्या बेटावर मनुष्य वसाहतही आहे. तिथे आजही 170 लोक राहतात. या बेटावर आकाश इतके स्वच्छ असते की तेथून ग्रह-तारे अतिशय स्पष्टपणे पाहता येऊ शकतात. हे बेट जपानच्या फूजी इजू नॅशनल पार्कच्या वर्तुळात येते. येथील ज्वालामुखीच्या विवराची उंची 3.5 किलोमीटर आणि रुंदी अडीच किलोमीटर आहे. हे बेट 1388 फूट उंचीचे आहे. येथील ज्वालामुखीचा 1781 ते 1785 या काळात सातत्याने उद्रेक झाला होता. मात्र, त्यानंतर अद्याप त्याचा उद्रेक झालेला नाही. जपानच्या हवामान विभागाने आता त्याला 'क' वर्गाच्या सक्रिय ज्वालामुखींच्या गटात समाविष्ट केलेले आहे. 1783 मध्ये तेथील ज्वालामुखीच्या उद्रेकात 327 लोकांपैकी 140 जणांचा मृत्यू झाला होता. 63 कुटुंबांनी त्यावेळी हे बेट सोडले होते. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT