मॅसॅच्युसेटस् (अमेरिका) : अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस्मध्ये राहणार्या एका महिलेने आकाशात एक रहस्यमय वस्तू पाहिल्याचा दावा केला आहे. आपल्या घराबाहेरील हॉट टबमध्ये आराम करत असताना तिने ही विचित्र वस्तू पाहिली आणि तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता चर्चेचा विषय ठरला आहे. कोलीन मॅकॉमक असे या महिलेचे नाव आहे.
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पेमब्रोक येथील तिच्या घराबाहेरील हॉट टबमध्ये असताना तिला आकाशात तरंगणारी एक लहान वस्तू दिसली. तिने सांगितले, मी हॉट टबमध्ये शांत बसले होते, तेव्हा माझी नजर आकाशाकडे गेली. तिथे काहीतरी लहान तरंगत होते. मी विचार केला, ‘हे काय आहे?’ यानंतर तिने लगेच आपला फोन काढून या द़ृश्याचा व्हिडीओ बनवला.
मॅकॉमकने दिलेल्या माहितीनुसार, असे वाटत होते की त्या वस्तूला आग लागली आहे आणि ती खूप वेगाने खाली येत होती. ती काय असू शकते याची मला काहीच कल्पना नाही. हा अनुभव सांगताना ती म्हणाली, माझ्या हृदयाची धडधड वाढली होती, कारण मी फक्त वर पाहिले आणि विचार केला,‘देवा, आता काय होणार आहे?’ ती वस्तू जमिनीवर कोसळल्यावर मोठा आवाज होईल अशी तिची अपेक्षा होती; परंतु ती नजरेआड झाल्यावर कोणताही आवाज आला नाही. खूप शांतता होती. काहीही ऐकू येत नव्हते. त्यामुळेच मी अधिक गोंधळले होते. दरम्यान, या घटनेबाबत फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अधिकार्याने सांगितले की, त्या परिसरात कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा अवशेष आढळल्याची कोणतीही तक्रार अथवा माहिती आमच्या पर्यंत आलेली नाही.