टँपा : अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाचे संशोधक एक असे तंत्रज्ञान विकसित करत आहेत, जे आपत्तीच्या वेळी हजारो लोकांचे प्राण वाचवू शकते. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि रोबोटस्चा वापर करते आणि आपत्कालीन परिस्थितीत आवाज किंवा शब्दांशिवाय संदेश पाठवण्यास मदत करते.
USF च्या बेलिनी कॉलेज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबरसिक्युरिटी आणि कॉम्प्युटिंगमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक ‘युनिफाईड ऑगमेंटेड रिअॅलिटी’ नावाच्या खास प्रकल्पावर काम करत आहेत. हा प्रकल्प रेअर (Reality, Autonomy and Robot Experience) लॅबमध्ये सुरू आहे. याचा मुख्य उद्देश आपत्तीच्या वेळी बचाव दलाला योग्य मार्ग दाखवणे किंवा महत्त्वाची माहिती देणे आहे. फॉक्स 13 च्या अहवालानुसार, प्रोफेसर डॉ. झाओ हान या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. ते सांगतात की, ‘आपत्तीच्या वेळी मोठा आवाज, ढिगारा किंवा सिग्नलचा अभाव यामुळे संवाद साधणे कठीण होते.
तुम्ही मोठ्याने ओरडलात तरी लोक ऐकू शकत नाहीत आणि वायरलेस सिग्नलदेखील काम करत नाहीत. म्हणूनच त्यांच्या टीमने रोबोटस्ना व्हिज्युअल सिग्नल (द़ृश्य संदेश) दाखवण्यासाठी तयार केले आहे. रेअर लॅबमध्ये सध्या चार रोबोटस्वर काम सुरू आहे, ज्यात एक ड्रोनदेखील समाविष्ट आहे. हे रोबोटस् जमिनीचे स्कॅन करतात, प्रकाश आणि पृष्ठभागाची बनावट समजून घेतात आणि त्यानंतर आवश्यक संदेश जमिनीवर किंवा भिंतींवर प्रोजेक्ट करतात. ‘बीएन बीएन’ नावाचा एक रोबो 45 अंशांच्या कोनात चालू शकतो आणि कठीण ठिकाणी पोहोचू शकतो. हा रोबो धोकादायक भागात जाऊन बचाव दलाला महत्त्वाची माहिती देऊ शकतो.
या प्रकल्पाला नॅशनल सायन्स फाऊंडेशनकडून सुमारे 3.4 कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे. टीमचे लक्ष्य आहे की हे तंत्रज्ञान लवकरात लवकर बाजारात आणले जावे, जेणेकरून बचाव कार्य जलद आणि सुरक्षित होऊ शकेल. या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे विद्यार्थी बाओ दिन्ह म्हणतात, ‘हे काम खूप महत्त्वाचे आहे. हा केवळ एक प्रकल्प नाही, तर जगातील लोकांना मदत करणारा एक शोध (आविष्कार) ठरू शकतो.’ विशेष म्हणजे, दरवर्षी आपत्कालीन परिस्थितीत अनेक लोकांचा मृत्यू फक्त यामुळे होतो, कारण ते मदतीसाठी सिग्नल देऊ शकत नाहीत. हे नवीन तंत्रज्ञान अशा परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी आशेचा किरण आहे.