Using AI | ‘एआय’च्या वापरात भारत जगात आघाडीवर Pudhari File Photo
विश्वसंचार

Using AI | ‘एआय’च्या वापरात भारत जगात आघाडीवर

देशातील तब्बल 92 टक्के कर्मचारी करतात ’एआय’चा वापर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरात भारताने जागतिक पातळीवर आघाडी घेतली आहे. देशातील तब्बल 92 टक्के कर्मचारी जेनरेटिव्ह एआय (GenAI) साधनांचा स्वीकार करत असून, हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा (72 टक्के) खूप जास्त आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या एका नवीन अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मात्र, या वेगाने होणार्‍या बदलामुळे भारतीय कर्मचार्‍यांमध्ये नोकरी गमावण्याची भीतीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बीसीजीच्या "AI at Work 2025: Momentum Builds, But Gaps Remain" या शीर्षकाच्या अहवालानुसार, एआय आता दैनंदिन कामाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 72 टक्के कर्मचारी नियमितपणे त्याचा वापर करतात. असे असले तरी, एआयचे खरे फायदे मोजक्याच कंपन्यांना मिळत आहेत, ज्या केवळ साधनांचा वापर करण्यापलीकडे जाऊन आपल्या संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये बदल घडवत आहेत. जगभरातील 11 देशांमधील 10,600 हून अधिक कर्मचार्‍यांच्या प्रतिसादावर आधारित या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ‘ग्लोबल साऊथ’ देश एआय स्वीकारण्यात आघाडीवर आहेत.

यामध्ये भारत (92 टक्के) आणि मध्य पूर्व (87 टक्के) हे देश नियमित वापराच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी आहेत. एकीकडे वापराचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे ऑटोमेशनमुळे नोकरी जाण्याची भीतीही याच देशांमध्ये सर्वाधिक आहे. जागतिक स्तरावर 41 टक्के लोकांना पुढील दशकात आपली नोकरी जाण्याची चिंता वाटते, तर भारतात हेच प्रमाण 48 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही वाढती अनिश्चितता अधोरेखित करते, असे मत बीसीजीचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ भागीदार निपुण कालरा यांनी व्यक्त केले. अहवालानुसार, भारतातील केवळ एक तृतीयांश कर्मचार्‍यांना असे वाटते की, त्यांना एआयच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळाले आहे.

एआय एजंट्ससारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यातही भारत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आहे; परंतु या वापराला योग्य प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. निपुण कालरा पुढे म्हणाले, ‘आता आपण एआयच्या सुरुवातीच्या टप्प्यातून पुढे जाऊन प्रत्यक्ष व्यावसायिक परिणाम मिळवण्याच्या दिशेने जात आहोत. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी कर्मचार्‍यांसाठी संरचित प्रशिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन आणि नेतृत्व विकासात गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळेच या तंत्रज्ञानाचा फायदा जबाबदारीने आणि सर्वसमावेशकपणे सर्वांपर्यंत पोहोचू शकेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT