अमेरिकेत उंदरांमध्ये हाडे व कूर्चा तयार करणार्‍या मूळपेशी ओळखण्यात यश. Pudhari File Photo
विश्वसंचार

उंदरांमध्ये हाडे, कूर्चा तयार करणार्‍या मूळपेशींचा शोध

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : स्टेमसेल्स म्हणजे मूळपेशी या शरीरातील अशा पेशी असतात, ज्यांचे रूपांतर शरीरातील कोणत्याही अवयवांच्या पेशींमध्ये करता येऊ शकते. त्यामुळे आधुनिक काळात अशा मूळपेशींवर मोठेच संशोधन झाले आहे व होत आहे. त्यांचा वापरही अनेक बाबतीत केला जात आहे. अमेरिकेत उंदरांमध्ये हाडे व कूर्चा तयार करणार्‍या मूळपेशी ओळखण्यात भारतीय वैज्ञानिकांसह काही जणांना यश आले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्राच्या वैज्ञानिकांनी या पेशी शोधल्या असून त्यात ऑस्टिओ कोनड्रोरेटिक्युलर (ओसीआर) या मूळपेशींचा समावेश आहे, त्या उंदराच्या अस्थिमज्जेत आढळून येतात.

या पेशींनी आविष्कृत केलेल्या एका प्रथिनाच्या मदतीने या पेशी ओळखण्यात आल्या असून त्यात मार्करचा वापर केला असता ओसीआर पेशी स्वत: नवीन तयार होतात व नवीन हाड व कूर्चापेशी तयार करतात असे दिसून आले आहे. हाडाच्या पेशींना ऑस्टिओब्लास्ट व कूर्चापेशींना कोंड्रोसाइट्स असे म्हणतात. ओसीआर स्टेम सेल्स म्हणजे मूळपेशी या हाड तुटलेल्या ठिकाणी लावल्या तर हाड दुरुस्त होऊ शकते. जखमी झाल्यानंतर या पेशी अशा प्रकारे काम करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, की नाही हे पाहणे बाकी आहे. जर उंदरात हाड मोडले तर या पेशी पुन्हा जिवंत करून हाड व कूर्चा तयार करता येतात. माणसामध्ये हे घडू शकते का याचा विचार अजून बाकी आहे, असे सीयूएमसीचे सहायक प्राध्यापक व लेखक सिद्धार्थ मुखर्जी यांनी सांगितले. संशोधकांच्या मते ओसीआर मूळपेशी मानवी हाडांच्या उतीत असतात व उंदीर व माणसाचे जीवशास्त्र हाडांच्या बाबतीत सारखेच आहे. यात आणखी अभ्यास केला, तर ओस्टिओपोपोसिस (हाडे ठिसूळ होणे) व ओस्टिओआर्थायटिस (हाडांचा संधिवात), हाडे तुटणे यात फायदा होऊ शकतो. आमच्या मते ओसीआर मूळपेशी हाडांची भरून येण्याची क्षमता वाढवतात व जी क्षमता वयोपरत्वे कमी होत जाते. असे टिमोथी सी वाँग, डोरोथी एल व डॅनियल एच सिलबर्ग या सीयूएमसीच्या प्राध्यापकांनी म्हटले आहे. प्रौढ ओसीआर पेशी या मेसेनशिमल स्टेम सेल (मूलपेशी- एमएससीएस) पासून वेगळ्या आहेत. त्यात हाडांच्या निर्मितीत प्रौढ वयात भूमिका पार पाडतात. एमएससीएस या मूळपेशी या हाडे, कूर्चा व मेद यांचा मूळ स्रोत असून आधुनिक अभ्यासानुसार या पेशी नवीन हाड किंवा कूर्चा तयार करीत नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT