वॉशिंग्टन ः जेफ बेजोस यांच्या ‘ब्ल्यू ओरिजिन’ कंपनीने अंतराळ संशोधन क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. पहिल्यांदाच पूर्णतः महिलांचा चमू घेऊन कंपनीचे यान अंतरिक्षात गेले आणि यशस्वीपणे परतले. या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील वॅन हॉर्न येथील लॉन्च साईटवरून सकाळी 9.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाली. या मोहिमेत 6 महिलांचा समावेश होता, ज्यात पॉप स्टार केटी पेरी, ‘सीबीएस मॉर्निंग्ज’ शोची होस्ट गेल किंग आणि जेफ बेजोस यांच्या वागदत्त वधू लॉरेन सांचेज यांचा समावेश होता.
‘न्यू शेपर्ड’ या यानाने महिला प्रवाशांना पृथ्वीपासून 100 किलोमीटर (62 मैल) उंचीवर नेले, जिथे त्यांनी कर्मन रेषा ओलांडली, जी पृथ्वी आणि अंतरिक्षाच्या सीमारेषा मानली जाते. प्रवाशांनी सुमारे 3 मिनिटं शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. त्यानंतर यानाने पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षित लँडिंग केले. गेल किंग म्हणाल्या, “मी असं अंतराळवीर होणं मला खरं वाटत नव्हतं; पण या अनुभवाने मला अंतर्मुख केलं. पृथ्वीवरून दूर गेल्यावर असं वाटलं की, माणसांनी आपली जगण्याची पद्धत अधिक चांगली करायला हवी.” केटी पेरीने उड्डाणाच्या आधी कार्ल सेगन यांची ‘कॉसमॉस’ आणि स्ट्रिंग थिअरीवर आधारित पुस्तकं वाचली. अंतरिक्षात असताना तिने ‘व्हॉट अ वंडरफूल वर्ल्ड’ हे गाणं गायले. लैंगिक अत्याचार पीडितांच्या हक्कांसाठी लढणार्या अमांडा गुयेन यांनी रुग्णालयातील पट्टी शून्य गुरुत्वाकर्षण इंडिकेटर म्हणून नेली होती. ती पट्टी अंतरिक्षात तरंगू लागली आणि त्यांनी ‘झिरो ग्रॅव्हिटी’चा अनुभव घेतला. लॉरेन सांचेज म्हणाल्या, “पृथ्वीला अंतरिक्षातून पाहणं हे एक विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होतं. मला वाटतं, या अनुभवाने मी पूर्णपणे बदलून जाईन.” ही फ्लाइट ब्ल्यू ओरिजिनचं 11 वं मानव अंतरिक्ष मिशन होतं. आतापर्यंत कंपनीने 52 जणांना अंतरिक्षाच्या उंबरठ्यावर नेलं आहे. प्रवास अवघ्या 10 मिनिटांचा असला, तरी त्यात शून्य गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचं विलोभनीय द़ृश्य पाहण्याचा अद्वितीय अनुभव मिळतो.