वॉशिंग्टन : नवीन सिम्युलेशननुसार, ‘सिटी किलर’ म्हणून ओळखला जाणारा लघुग्रह ‘2024 YR4’ जर सात वर्षांनी चंद्रावर आदळला, तर पृथ्वीवर ‘बुलेटसारख्या’ अवशेषांचा वर्षाव होऊ शकतो. हा एक थरारक उल्का वर्षाव असेल; परंतु त्याच वेळी आपल्या ग्रहाभोवती फिरणार्या कृत्रिम उपग्रहांना धोका निर्माण होऊ शकतो.
‘2024 YR4’ हा अंदाजे 200 फूट (60 मीटर) रुंदीचा एक संभाव्य धोकादायक लघुग्रह आहे. जर तो थेट पृथ्वीवर आदळला, तर एक मोठे शहरी क्षेत्र नष्ट करण्यासाठी तो पुरेसा आहे. हा लघुग्रह डिसेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा शोधला गेला होता; परंतु या वर्षाच्या सुरुवातीला तो चर्चेत आला, जेव्हा शास्त्रज्ञांनी भाकीत केले की, 22 डिसेंबर 2032 रोजी तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीमध्ये या टकरीची शक्यता 3.1 टक्केपर्यंत पोहोचली होती, ज्यामुळे ‘नासा’ला त्याचा सखोल अभ्यास करावा लागला. तथापि, त्यानंतरच्या विश्लेषणात स्पष्ट झाले की, तो आपल्या ग्रहावर आदळण्याची शक्यता शून्य आहे; परंतु एप्रिलमध्ये, संशोधकांना आढळले की पृथ्वी जरी धोक्याच्या बाहेर असली तरी, हा लघुग्रह चंद्रावर आदळू शकतो. अशा टकरीची शक्यता हळूहळू पण स्थिरपणे वाढत आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीला ती 4.3 टक्क्यांपर्यंत पोहोचली. 2028 पर्यंत याची अंतिम शक्यता कळेल, जेव्हा हा लघुग्रह आपल्या ग्रहाच्या जवळून जाईल.
12 जून रोजी प्रीप्रिंट सर्व्हर arXiv वर अपलोड केलेल्या एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी चंद्रावरील आघाताचे मॉडेल तयार करण्यासाठी संगणकीय सिम्युलेशन चालवले. टीमने अंदाज लावला आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावरून 220 दशलक्ष पौंड (100 दशलक्ष किलोग्राम) पर्यंत सामग्री बाहेर फेकली जाऊ शकते. जर 2024 YR4 चंद्राच्या पृथ्वी-मुखी बाजूला आदळला, ज्याची शक्यता अंदाजे 50/50 आहे, तर यातील 10 टक्के अवशेष पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पुढील काही दिवसांत खेचले जाऊ शकतात, असे शास्त्रज्ञांनी लिहिले आहे.