बुडबुड्यांच्या मदतीने पाण्याखाली श्वास घेणारा सरडा. Pudhari File Photo
विश्वसंचार

पाण्याखाली बुडबुड्याच्या साहाय्याने श्वास घेणारा सरडा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जगभरात सरड्यांच्याही अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी ‘स्कुबा-डायव्हिंग लिझार्डस्’नी पाण्याखाली जाऊन शत्रूपासून बचाव करण्यासाठी एक अनोखे कौशल्य विकसित केलेले आहे. त्यांना आपल्या कपाळ व तोंडाच्या मधल्या भागावर हवेचा बुडबुडा बनवता येतो व त्याच्या सहाय्याने ते पाण्याखाली श्वास घेत दीर्घकाळ राहू शकतात.

2018 मध्ये संशोधकांनी अशा सेमी-अ‍ॅक्वॅटिक म्हणजेच अर्धजलीय सरड्याचे चित्रीकरण करण्यात यश मिळवले होते. त्याला स्ट्रीम अनोल असे नाव असून वैज्ञानिक भाषेत त्याला ‘अनोलिस ऑक्सिलोफस’ असे म्हटले जाते. हे सरडे तोंडावरील ऑक्सिजनयुक्त हवेच्या बुडबुड्याच्या सहाय्याने पाण्यात श्वास घेतात, असे आढळले. असा ऑक्सिजनचा साठा असलेला बुडबुडा बनवण्याची व त्याच्या मदतीने पाण्याखाली श्वास घेण्याची क्षमता अन्य सरड्यांमध्ये आढळत नाही. त्यावेळेपासून अशा अनोल सरड्यांच्या अन्य 18 प्रजाती शोधण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्येही असा बुडबुडा बनवण्याची क्षमता असते. यापैकी एक प्रजाती म्हणजे ‘वॉटर अनोल’ (अनोलिस अ‍ॅक्वाटिकस). पाण्याला दूर ठेवणार्‍या त्वचेचा हा ‘साईड इफेक्ट’ आहे की त्याच्या सहाय्याने हे सरडे पाण्याखाली दीर्घकाळ राहू शकतात, याची माहिती संशोधकांना अद्याप नव्हती. आता नव्या संशोधनात त्यांची ही पाण्याखाली श्वास घेण्याची ‘ट्रिक’ असल्याचेच निष्पन्न झाले आहे. या संशोधनाची माहिती ‘बायोलॉजी लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुमारे तीस वॉटर अनोल्स सरड्यांवर याबाबतचे संशोधन करण्यात आले. ज्या अनोल सरड्यांकडे ही क्षमता असते ते अशी क्षमता नसलेल्या अनोल सरड्यांच्या तुलनेत 32 टक्के अधिक काळ पाण्याखाली राहू शकतात, असे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT