लंडन : नाईल नदीच्या खोर्यात सापडलेल्या 4,500 वर्षे जुन्या एका मानवी सांगाड्याच्या डीएनए चाचणीने प्राचीन इतिहासाचे एक मोठे कोडे उलगडले आहे. या चाचणीतून प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमिया (आधुनिक इराक) या दोन संस्कृतींमध्ये थेट मानवी संबंध असल्याचे प्रथमच सिद्ध झाले आहे, ज्यामुळे इतिहासाच्या अनेक सिद्धांतांना नवी दिशा मिळाली आहे.
कैरोपासून दक्षिणेला असलेल्या नुवायरत गावात सापडलेल्या एका 60 वर्षीय पुरुषाच्या सांगाड्यावर लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी अभ्यास केला. हा व्यक्ती कुंभार असावा, असा अंदाज आहे. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या डीएनए विश्लेषणात असे आढळले की, त्याच्या एकूण डीएनएपैकी 20 टक्के भाग हा तब्बल 1,500 किलोमीटर दूर असलेल्या मेसोपोटेमियातील पूर्वजांकडून आला होता. हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंत दोन्ही संस्कृतींमध्ये व्यापार किंवा कल्पनांची देवाणघेवाण झाल्याचे केवळ पुरातत्त्वीय पुरावे होते. पण, लोकांचे स्थलांतर झाल्याचा हा पहिला ठोस जैविक पुरावा आहे.
या शोधामुळे, इजिप्तमध्ये लेखनकला आणि शेतीचा विकास केवळ स्वबळावर झाला नसून, त्यात मेसोपोटेमियन लोकांचे आणि त्यांच्या कल्पनांचेही योगदान असावे, या सिद्धांताला प्रचंड बळकटी मिळाली आहे. प्रमुख संशोधक प्राध्यापक पोंटस स्कोगलंड यांच्या मते, हा शोध इतिहासाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलणारा आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंतचा लिखित इतिहास हा बहुतांशी राजे-महाराजे आणि श्रीमंत लोकांबद्दलच सांगतो. पण, डीएनए तंत्रज्ञानामुळे आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या सामान्य माणसाच्या जीवनात डोकावता येत आहे.
रुक्ष वाटणारी ऐतिहासिक तथ्ये आता रंगीत तपशिलांसह जिवंत होत आहेत. ‘इजिप्त आणि मेसोपोटेमियाच्या उदयाचा काळ (सुमारे 4,500 ते 4,800 वर्षांपूर्वी) हा जागतिक इतिहासातील एक परिवर्तनाचा काळ मानला जातो. याच काळात या दोन्ही संस्कृतींनी मोठी झेप घेतली. हा शोध केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, तो दोन महान संस्कृतींमधील मानवी संबंधांचा आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा एक महत्त्वाचा दुवा आहे. भविष्यात अशा संशोधनामुळे प्राचीन जगाच्या इतिहासाची अनेक अज्ञात पाने उलगडली जातील, अशी आशा संशोधकांना आहे.