स्पोर्ट्स

WPL Auction 2026 : ‘डब्ल्यूपीएल’बाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेला लिलाव होण्याची शक्यता

WPL Auction : लिलावात सुमारे ९० खेळाडूंवर बोली लागणार

रणजित गायकवाड

ठळक मुद्दे :

  • नोव्हेंबरच्या २६ किंवा २७ तारखेला डब्ल्यूपीएल लिलावाचे आयोजन होण्याची शक्यता

  • लिलाव दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आयोजित केला जाईल

  • एकाच दिवसात सर्व संघांचे खेळाडू निश्चित केले जातील

WPL Auction 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावा संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. वृत्तानुसार, पुढील महिन्यात, म्हणजे नोव्हेंबरच्या २६ किंवा २७ तारखेला डब्ल्यूपीएल लिलावाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, हा लिलाव २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणार होता, परंतु त्यानंतर बीसीसीआयने त्याच्या तारखेत बदल केला आहे. हा लिलाव दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आयोजित केला जाईल, असे मानले जात आहे.

'क्रिकबझ'च्या एका वृत्तानुसार, या लिलावासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही. तथापि, हा लिलाव एकाच दिवसात पूर्ण होईल, असे मानले जात आहे. त्यामुळे, २६ किंवा २७ नोव्हेंबर यापैकी कोणत्याही एका दिवशी डब्ल्यूपीएल २०२६ चा लिलाव होऊ शकतो. डब्ल्यूपीएलमध्ये एकूण ५ संघ खेळतात आणि त्यामुळे त्यांच्या लिलावाला जास्त वेळ लागणार नाही, परिणामी एकाच दिवसात सर्व संघांचे खेळाडू निश्चित केले जातील.

लिलावात सुमारे ९० खेळाडूंवर बोली लागणार

सुमारे ९० खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता आहे, तरीही बहुतांश संघांमधील अनेक खेळाडूंना रिटेन केले जाण्याची शक्यता आहे. सर्व ५ फ्रेंचायझींना ५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

रिटेन केलेल्या खेळाडूंना किती रक्कम मिळेल?

डब्ल्यूपीएलने खेळाडूंना रिटेन ठेवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. यानुसार टॉपच्या खेळाडूला ३.५ कोटी रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील रिटेन खेळाडूंना अनुक्रमे २.५ कोटी, १.७५ कोटी, १ कोटी आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम मिळेल.

लिलावात प्रत्येक फ्रँचायझी किती रक्कम खर्च करू शकेल?

जर एखाद्या संघाने जास्तीत जास्त ५ खेळाडूंना कायम ठेवले, तर त्यांच्या पर्समध्ये ५.७५ कोटी रुपये शिल्लक राहतील, जी रक्कम फ्रँचायझी लिलावात खर्च करू शकेल. डब्ल्यूपीएलने प्रथमच फ्रँचायझींना लिलावात 'राइट-टू-मॅच' (RTM) चा पर्याय वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्यायाद्वारे संघ २०२५ मध्ये त्यांच्या संघाचा भाग असलेल्या कोणत्याही खेळाडूला लिलावाद्वारे परत खरेदी करू शकतात. यासोबतच, डब्ल्यूपीएलने पुढील हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावासाठी १५ कोटी रुपयांची लिलाव पर्स (ऑक्शन पर्स) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT