स्पोर्ट्स

Irani Trophy : इराणी चषक स्पर्धेत विदर्भ विजेता, हर्ष दुबे-यश ठाकूर यांचा भेदक मारा; शेष भारताचा 93 धावांनी पराभव

यश धूल, मानव सुतारची झुंज निष्फळ, पहिल्या डावात 143 धावा करणारा अथर्व तायडे ‘सामनावीर’

रणजित गायकवाड

नागपूर : यश धूल (92) व मानव सुतार (नाबाद 56) यांनी तडफदार अर्धशतके झळकावल्यानंतरही विदर्भाने शेष भारताचा 93 धावांनी सहज फडशा पाडत इराणी चषक जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केले. 361 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पाचव्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात शेष भारताचा संपूर्ण संघ 267 धावांवर सर्वबाद झाला. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे (4/73) आणि वेगवान गोलंदाज यश ठाकूर (2/47) यांनी विदर्भाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

विदर्भाने आतापर्यंत तीन इराणी चषक सामने खेळले असून, तिन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. श्रेय दुबे आणि ठाकूर यांनी सामन्यात प्रत्येकी सहा बळी मिळवत दोन्ही डावांत मिळून शेष भारत संघाला सातत्याने धक्के दिले. अंतिम दिवसाच्या पहिल्या सत्रात शेष भारताची अवस्था 6 बाद 133 अशी होती. त्यानंतर, धूल आणि मानव सुतार यांनी सातव्या गड्यासाठी 104 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश ठाकूरने धूलला बाद करत शेष भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.

धूलने ठाकूरच्या चेंडूवर स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, पण डीप थर्ड मॅनला उभ्या असलेल्या अथर्व तायडेने सीमारेषेनजीक उत्कृष्ट झेल घेतला. पहिल्या डावात 143 धावांची खेळी करणार्‍या आणि धूलचा महत्त्वाचा झेल घेणार्‍या विदर्भाच्या अथर्व तायडेला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. आकाश दीपने या लढतीत उत्तम कामगिरी साकारत आपल्या तंदुरुस्तीचा उत्तम दाखला दिला. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत तो दुखापतग्रस्त झाला होता.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ पहिला डाव : 342. शेष भारत पहिला डाव : 214. विदर्भ दुसरा डाव : 232. शेष भारत दुसरा डाव टार्गेट 361 : 73.5 षटकांत सर्वबाद 267. (यश धूल 117 चेंडूंत 92. मानव सुतार 113 चेंडूंत नाबाद 56. हर्ष दुबे 4/73, आदित्य ठाकरे, यश ठाकूर प्रत्येकी 2 बळी)

धूल-ठाकूर यांच्यात मैदानावर वाद

या लढतीला धूल बाद झाल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीचे गालबोट लागले . गोलंदाज ठाकूरने धूल बाद झाल्यानंतर आक्षेपार्ह हातवारे केले आणि त्यानंतर उभयतांत शाब्दिक बाचाबाची झाली. उभयतांत अगदी एकमेकांना धक्के देण्यापर्यंत मजल जात असताना दोन्ही मैदांनी पंचांनी व विदर्भच्या क्षेत्ररक्षकांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर सारले.

विदर्भ संघाने चांगला खेळ केला आणि ते विजयाचे हक्कदार होते. आम्ही परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करून अधिक जबाबदारीने खेळलो असतो, तर धावसंख्येच्या जवळ पोहोचू शकलो असतो.
- रजत पाटीदार, कर्णधार, शेष भारत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT