बांगला देशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला.  File Photo
स्पोर्ट्स

ग्रीन पार्कची खेळपट्टी ‘फिरकी’ घेणार

पुढारी वृत्तसेवा

कानपूर : बांगला देशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेऊन भारतीय संघ 27 सप्टेंबरपासून कानपूर कसोटीत मैदानावर उतणार आहे; पण यावेळी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे. दोन्ही संघ अतिरिक्त फिरकी गोलंदाज घेऊन खेळण्याची शक्यता आहे.

कानपूरमध्ये 27 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या भारत-बांगला देश कसोटीची खेळपट्टीसाठी काळी माती वापरली गेली आहे. त्यामुळे चेन्नईच्या लाल मातीच्या खेळपट्टीच्या तुलनेत कानपूरच्या खेळपट्टीवर जास्त बाऊन्स मिळणार नाही. ग्रीन पार्कची खेळपट्टी चेन्नईच्या खेळपट्टीपेक्षा सपाट असेल आणि कसोटी जसजशी पुढे सरकेल तसा बाऊन्सही कमी होईल. कानपूरची खेळपट्टी संथ असण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही संघ आपली रणनीती बदलू शकतात. दोन्ही संघ अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानावर उतरू शकता. त्यामुळे आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या जोडीला भारताला कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवावे लागेल.

2021 मध्ये भारताने कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती आणि तेव्हा भारतीय संघ अश्विन, जडेजा, अक्षर या फिरकी त्रिकुटासह मैदानात उतरले होते. न्यूझीलंडने हा सामना अनिर्णित सोडवला होता. 27 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाईल, असा अंदाज होता; पण तो ही कसोटी खेळेल आणि मोहम्मद सिराज किंवा आकाश दीप यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

कर्णधार रोहितचा लागणार कस...

तिसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची नावे चर्चेत आहेत. कुलदीपने गोलंदाजीत कमाल करून दाखवली आहे. परंतु, अक्षर अष्टपैलू कामगिरी करणारा आहे. नुकत्याच दुलिप ट्रॉफीत त्याने फलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे या दोघांपैकी रोहित कोणाला संधी देतो, याची उत्सुकता आहे.

बांगला देशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव ज्युरेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT