स्पोर्ट्स

IND vs WI Test : टीम इंडिया पुन्हा जलद विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज, विंडीजसाठी पुन्हा ‘अस्तित्वाची लढाई’

पहिल्या कसोटीत विंडीजचा संघ सर्व आघाड्यांवर चारीमुंड्या चीत झाला आहे.

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : आत्मविश्वासपूर्ण यजमान भारतीय संघ शुक्रवारी सुरू होणार्‍या दुसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यात झगडणार्‍या वेस्ट इंडिज संघाशी दोन हात करेल. या लढतीत साई सुदर्शनचे मनोधैर्य आणि नितीशकुमार रेड्डीची मायदेशातील परिस्थितीनुसार असणार्‍या उपयुक्ततेचे मूल्यमापन हे भारताच्या द़ृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.

अतिशय प्रतिभाशाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही अव्वल संघात स्थान मिळवण्यास सक्षम असलेल्या क्रिकेटपटूंच्या या उत्कृष्ट चमूपुढे वेस्ट इंडिजचा संघ अगदीच फिका आहे, हे यापूर्वीच सुस्पष्ट झाले आहे. पहिल्या कसोटीत विंडीजचा संघ सर्व आघाड्यांवर चारीमुंड्या चीत झाला आहे.

आपला गौरवशाली भूतकाळ गमावलेला हा संघ पारंपरिक कसोटी क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही अस्तित्वाची लढाईच असणार आहे. सध्याच्या विंडीज संघातील बहुतांशी खेळाडू कामचलाऊ श्रेणीतील आहेत.

सध्या विस्तारत असलेल्या टी-20 लीगमधील फ्रँचायझीदेखील या खेळाडूंना करारबद्ध करणार नाहीत, इतका त्यांचा दर्जा खालावलेला आहे. अहमदाबादमधील पहिल्या कसोटीत विंडीजने कोणताही प्रतिकार न करता स्वीकारलेला डावाचा पराभव, हे त्याचेच प्रतिबिंब मानले जात आहे.

हा खेळ आकड्यांचा!

0 : भारताने नोव्हेंबर 1987 नंतर दिल्लीत आजवर एकही कसोटी गमावलेली नाही. योगायोगाने ती कसोटी विंडीजविरुद्धच होती. त्यानंतर भारताने आतापर्यंत या मैदानात 12 विजय मिळवले, तर 12 सामने अनिर्णीत राखले आहेत.

10 : रवींद्र जडेजाला 4 हजार कसोटी धावांचा माईलस्टोन सर करण्यासाठी आता फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. यापूर्वी कसोटीत 4 हजार धावा व 300 बळींचा माईलस्टोन सर करण्याचा पराक्रम इयान बोथम, कपिल देव व डॅनिएल व्हेटोरी या तिघांनाच शक्य झाला आहे.

भारत वि. वेस्ट इंडिज

स्थळ : जेटली स्टेडियम, दिल्ली

वेळ : सकाळी 9.30 पासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओ हॉटस्टार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT