इंदोर; वृत्तसंस्था : टॅझमिन ब्रिटस् (101 धावा) व सुने लूस (नाबाद 83) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. प्रारंभी, न्यूझीलंड महिला संघाचा डाव 231 धावांत गारद करत द. आफ्रिकन संघाने विजयाचे लक्ष्य 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 40.5 षटकांत पार केले. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर गाजवलेले जोरदार वर्चस्व हे द. आफ्रिकेच्या या विजयाचे ठळक वैशिष्ट्य ठरले.
विजयासाठी 232 धावांचे आव्हान असताना सलामीवीर लॉरा 14 धावांवर बाद झाली. मात्र, बिटस व सूने लूस या जोडीने दुसर्या गड्यासाठी 159 धावांची भक्कम भागीदारी साकारत विजयाचे दरवाजे संघासाठी सताड उघडले. टॅझमिन बिटस्ने 89 चेंडूंत 15 चौकार, 1 षटकारासह 101 धावा, तर सूने लूसने 114 चेंडूंत 83 धावांचे योगदान दिले. शतकवीर ब्रिटस् दुसर्या गड्याच्या रूपाने बाद झाली, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी नाममात्र 47 धावांची आवश्यकता होती.
कॅप (14) व बोश्च (0) स्वस्तात बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची मधल्या फळीत थोडीफार पडझड झाली. मात्र, लूसने सिनालोसह विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या डावाचे मुख्य आकर्षण ठरली त्यांची सलामीवीर टॅझमिन ब्रिटस्ची उत्कृष्ट, झटपट शतकी खेळी. तिने आक्रमक स्ट्रोकप्ले आणि अचूक टायमिंगचे प्रदर्शन करत आपला शतकी टप्पा गाठला. शतक पूर्ण होताच तिने एका गुडघ्यावर बसून धनुष्यबाण चालवल्याप्रमाणे खास शैलीत जल्लोष केला, तो लक्षवेधी ठरला.
तत्पूर्वी, अवघ्या 98 चेंडूंत 9 चौकारांसह 85 धावा झळकावत सोफा डिव्हाईनने तडफदार खेळी साकारल्यानंतर देखील न्यूझीलंड महिला संघाला 47.5 षटकांत सर्वबाद 231 धावांवर समाधान मानावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या नॉनकुलुलेको म्लाबाने आपल्या अप्रतिम फिरकीने सामन्याचे चित्र पालटण्यात सिंहाचा वाटा उचलला.
म्लाबाने 40 धावांत 4 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. यात डिव्हाईन आणि ब्रूक हॉलिडे यांच्या महत्त्वपूर्ण विकेटस्चा समावेश होता. डिव्हाईन आणि हॉलिडे यांनी चौथ्या विकेटसाठी 86 धावांची मजबूत भागीदारी रचली. मात्र, तोवर 3 बाद 187 धावा अशा उत्तम स्थितीत असताना न्यूझीलंडचा संघ तेथून पुढे कमालीचा गडगडला आणि त्यांनी 47.5 षटकांत 231 धावांत गाशा गुंडाळला. आपला 300 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्या डिव्हाईनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सामन्यातील 112 धावांच्या खेळीनंतर या सामन्यातही झुंजार 85 धावा केल्या. नंतर लेग साईडला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात ती म्लाबाची शिकार ठरली.