मनु भाकर File photo
स्पोर्ट्स

मनू भाकरचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर, "माझी ऑलिम्पिक पदके..."

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदकांवर मोहोर उमटवत भारताची नेमबाज मनू भाकरने ( Manu Bhaker) इतिहास घडवला. देशभरातून तिच्‍यावर कौतुकांचा वर्षाव झाला. आता ती खेळापासून काही काळ ब्रेक घेत आपल्‍या यशाचा आनंद साजरा करत आहे. अशातच ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. तिनेही ट्रोल करणार्‍यांना सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे.

मनू भाकर ट्रोल का झाली?

मनू भाकर नुकत्‍याच एका व्‍यावसायिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये पटकावेली दोन्‍ही कांस्‍य पदकाने घातली होती. यामुळे मनू भाकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ऑलिम्पिक पदकांसह कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड प्रत्युत्तर

सोशल मीडियावर ट्रोल करणार्‍यांना मनू भाकरने आज (दि. २५ सप्‍टेंबर) सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X वर सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे. तिने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये मी जिंकलेली दोन कांस्य पदके भारताची आहेत. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते येथे ही पदके दाखवण्यास सांगितले जाते. मी अभिमानाने ही पदके सर्वांना दाखवले. हा माझा सुंदर प्रवास शेअर करण्याचा माझा मार्ग आहे."

पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये मनू भाकरने घडवला इतिहास

पॅरीस आलिम्‍पिकमध्‍ये मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. तिने प्रथम 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्‍य पदक पटकावले. यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंग याच्‍यासोबत दुसर्‍या कांस्‍य पदकाला गवसणी घातली. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.

मनू भाकरच्‍या नावावर 'विक्रमांची मांदियाळी'

  • मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली

  • एकाच ऑलिम्पिक स्‍पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू .

  • दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिला भारतीय नेमबाज ठरण्‍याचा विक्रमही तिच्‍या नावावर नोंदला गेला आहे.

  • ऑलिम्पिकमध्ये सांघिक पदक जिंकणारी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग ही पहिली भारतीय नेमबाजी जोडी ठरली होती .

  • वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर पहिली नेमबाज.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT