स्पोर्ट्स

IPL Retention : आयपीएल संघात सहा खेळाडू कायम

रणजित गायकवाड

बंगळूर, वृत्तसंस्था : IPL Retention : बंगळूर येथे झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी फ्रँचायझींच्या अपेक्षेनुसार आणि मागणीनुसार राखून ठेवल्या जाणार्‍या खेळाडूंची संख्या 4 वरून 6 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 5 खेळाडू राखून (रिटेन) ठेवणे आणि एक ‘मॅचचा अधिकार’ समाविष्ट असेल. लिलावादरम्यान नियमांनुसार ठेवली जाऊ शकते. पण 5 खेळाडू डायरेक्ट रिटेन्शनसाठी फ्रँचायझीला 75 कोटी रुपयांची मोठी रक्कमही खर्च करावी लागणार आहे.

जर फ्रँचायझींनी 5 खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. कारण पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. तसेच जर फ्रँचायझींनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले; तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

त्याचबरोबर राईट टू मॅच कार्ड वापरून फ्रँचायझींना किमान एका खेळाडूला पुन्हा संघात घेता येणार आहे. त्याचबरोबर यंदा फ्रँचायझीच्या पर्समधील पैशांची मर्यादाही वाढवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यंदा फ्रँचायझींची पर्स मनीची मर्यादा 115 ते 120 कोटी करण्यात येऊ शकते.

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील मोसमासाठीचा मेगा लिलाव पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक होणार आहे. मेगा लिलावात खेळाडूंची कमाई वाढणार आहे. अनेक खेळाडू करोडपती होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल मेगा लिलावासाठी खेळाडू कायम ठेवण्याचे नियम निश्चित केल्यामुळे हे घडणार आहे.

शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बंगळूर येथे बैठक झाली. ज्यामध्ये रिटेनशन पॉलिसीवर निर्णय घेण्यात आला. मंडळाने यापूर्वी जुलैमध्ये सर्व 10 फ्रँचायझी मालकांसोबत या विषयावर बैठक घेतली होती. जिथे बोर्डाने फ्रँचायझी मालकांकडून टिकवून ठेवण्याबाबत मत व्यक्त केले होते. आता 2 महिन्यांनंतर बोर्डाने आपल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेतला आहे आणि फ्रँचायझींनाही आनंद दिला आहे.

शेवटच्या मेगा लिलावामध्ये रिटेन्शन नियम काय होता?

शेवटचा मेगा लिलाव 2022 मध्ये झाला होता, जेव्हा गुजरात आणि लखनौचे 2 नवीन संघ लीगमध्ये जोडले गेले होते. त्यानंतर संघ 42 कोटी रुपयांमध्ये 4 खेळाडूंना कायम ठेवू शकले. ज्यामध्ये एका खेळाडूला 16 कोटी रुपये, एकाला 12 कोटी रुपये, एकाला 8 कोटी रुपये आणि एकाला 6 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. तर 3 खेळाडूंना कायम ठेवणार्‍या संघांना 33 कोटी रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर संघांकडे राईट टू मॅच कार्डही होते.

खेळाडूंची दिवाळी प्रत्येकाला मिळणार 7.5 लाख रुपये सामना शुल्क

इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग आहे. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अशातच बीसीसीआय सचिव जय शहा यांनी खेळाडूंसाठी एक मोठी घोषणा केली. आता क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी तब्बल 7.5 लाख रुपये सामना शुल्क दिले जातील. तसेच एका हंगामातील सर्व लीग सामने खेळणार्‍या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1.05 कोटी रुपये मिळतील. प्रत्येक फ्रँचायझी एका हंगामात मॅच फी म्हणून 12.60 कोटी रुपयांचे वाटप करेल. आयपीएल लिलावात बहुतांश खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळत असतात. आता त्यांना मॅच फीच्या रूपातही मानधन मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT