मुंबई; वृत्तसंस्था : सात वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव करून महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. सचिन तेंडुलकरसह आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतीय महिला संघ वर्ल्डकप जिंकेल, त्याचा तो हक्कदार आहे, अशा शब्दांत अंतिम सामन्यात कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने भारतीय महिला संघाच्या कामगिरीला ‘शानदार विजय’ म्हटले आहे.
सचिनने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘शाब्बास जेमी आणि हरमन, तुम्ही तडफदार कामगिरी केली. तुम्ही चेंडूने सामना जिवंत ठेवला. आता फायनलमध्येही तिरंगा उंच फडकवत राहा.’ विराट कोहलीने लिहिले, ‘ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध भारतीय महिला संघाचा शानदार विजय आहे. मुलींनी शानदार पाठलाग केला आणि जेमिमाने इतक्या मोठ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. हे खरोखरच धैर्य, विश्वास आणि उत्कटतेचे एक भव्य प्रदर्शन होते. शाब्बास, टीम इंडिया.’
भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. गंभीरने लिहिले, ‘सर्व काही संपेपर्यंत ते संपत नाही. तुम्ही सर्वांनी किती छान खेळ केला.’ भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने उपांत्य सामना संपल्यानंतर लगेचच जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनज्योत कौर यांच्या सेलिब्रेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, ‘शाब्बास टीम इंडिया.’ ‘मुलींनी केलेली कामगिरी अद्भुत आहे. गेल्या पाच वर्षांत त्या खूप चांगल्या झाल्या आहेत. अजून एक खेळ बाकी आहे. फक्त उत्कृष्ट, असे गौरवोद्गार सौरभ गांगुलीने काढले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने लिहिले, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत आत्मविश्वास, जोश आणि जिंकण्याची भूक या सर्व गोष्टी दिसून आल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या उच्च दर्जाच्या कामगिरीबद्दल आणि विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन.’