Twitter
स्पोर्ट्स

Team India Win : भारतासमोर बांगलादेशचे लोटांगण, रोहितसेनेचा 280 धावांनी विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN Test : भारतीय गोलंदाजांनी चेन्नई कसोटीच्या दुस-या डावातही वर्चस्व राखून पुन्हा एकदा बांगलादेशच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. टीम इंडियाच्या भेदक मा-यापुढे पाहुण्या संघाचा टीकाव लागला नाही. अखेर भारताने हा सामना 280 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी 515 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा दुसरा डाव 234 धावांत आटोपला. हा सामना 4 दिवसात संपला. भारताचा बांगलादेशविरुद्धचा कसोटीतील हा 12वा विजय ठरला आहे.

रविचंद्रन अश्विनने कहर केला आणि सहा विकेट घेतल्या. कसोटीत 37 व्यांदा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम नोंदवला. याबाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नची बरोबरी केली.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने शतक (113) तर रवींद्र जडेजा (86) आणि यशस्वी जैस्वाल (56) यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांत गारद झाला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात बांगलादेशला फॉलोऑन न देता फलंदाजी केली. पहिल्या डावाच्या आधारे आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाने शुभमन गिल (119*) आणि ऋषभ पंत (109) यांच्या शतकांमुळे आपला दुसरा डाव 4 बाद 287 धावांवर घोषित केला आणि पाहुण्यांना विजयासाठी 514 धावांचे टार्गेट दिले.

बांगलादेशने गमावल्या 76 धावांत 6 विकेट

रविवारी बांगलादेशने चार विकेट्सवर 158 धावांवर खेळ सुरू केला. पण पुढील दोन तासातच भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या उर्वरीत सहा फलंदाजांना पॅव्हेलियनाचा रस्ता दाखवून सामना खिशात घातला. यादरम्यान. बांगलादेशाला केवळ 76 धावा करता आल्या. याआधी शनिवारी झाकीर हसन (33), शादमान इस्लाम (35), मोमिनुल हक (13) आणि मुशफिकुर रहीम (13) पॅव्हेलियनमध्ये परतले होते. अश्विनने शनिवारपर्यंत तीन बळी घेतले होते. त्याने शादमान, मोमिनुल आणि रहीम यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

सामन्याच्या चौथ्या दिवशी काय घडले?

अश्विनने रविवारी बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याने शकिब अल हसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शाकिब आणि शांतोमध्ये 48 धावांची भागीदारी झाली. शाकिबला 25 धावा करता आल्या. तो आऊट होताच बांगलादेश संघाला गळती लागली. त्यांच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या. रवींद्र जडेजाने लिटन दासला स्लीपमध्ये रोहित शर्माकरवी झेलबाद केले. लिटनला एक धाव करता आली. यानंतर अश्विनने मेहदी हसन मिराज (8)ला जडेजा करवी झेलबाद करून कसोटीत 37व्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम नोंदवला.

यानंतर जडेजाने कर्णधार नजमुल हुसैन शांतोला बुमराहच्या हाती झेलबाद केले. शांतोने 127 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 82 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्यानंतर अश्विनने तस्किन अहमदला सिराजकरवी झेलबाद केले. त्याला पाच धावा करता आल्या. जडेजाने हसन महमूदला (7) क्लीन बोल्ड केल्याने बांगलादेशचा डाव 234 धावांवर संपुष्टात आला. यासह टीम इंडियाने विजयावर शिक्कामोर्तब केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT