स्पोर्ट्स

IND vs AUS 2nd T20 : कर्णधार सूर्यकुमार फॉर्मात परतल्याने भारताचे पारडे जड

IND vs AUS T20 Series : भारताचे युवा फलंदाज पुन्हा एकदा तुटून पडण्यासाठी सज्ज, उभय संघांत चुरशीची लढत अपेक्षित, गोलंदाजीत बुमराहवर भिस्त

रणजित गायकवाड

मेलबर्न : युवा खेळाडूंची आक्रमकता आणि कर्णधार सूर्यकुमार यादव बहरात परतल्याने भारतीय संघ शुक्रवारी (दि. 31) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय खेचून आणण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबेसारख्या युवा खेळाडूंचे योगदान यावेळी विशेष महत्त्वाचे ठरू शकते. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी या लढतीला सुरुवात होईल.

अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांसारख्या खेळाडूंनी आपल्या आक्रमक फटकेबाजीने टी-20 फलंदाजीची कला नव्याने परिभाषित केली आहे, मात्र, मागील लढतीत बहरात परतलेल्या सूर्यकुमार यादवचे त्यापूर्वीचे अपयश चिंताजनक ठरले होते.

5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने 24 चेंडूंत 39 धावांची खेळी करत आपण बहरात परतत असल्याचा इशारा दिला. जोश हेझलवूडला मारलेला त्याचा 125 मीटरचा षटकार लक्षवेधी ठरला होता. मात्र, नंतर त्या लढतीत पावसाचाच वरचष्मा राहिला आणि सामना रद्द करण्यात आला. त्यावेळी भारताने 9.4 षटकांत 1 बाद 97 अशी भक्कम धावसंख्या उभारली होती आणि सूर्यकुमार व शुभमन गिल दोघेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत होते.

मेलबर्नमध्येही शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे; परंतु आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींची चिंता न करता, भारतीय संघ पहिल्या सामन्यात जिथे खेळ थांबवला होता, तिथूनच पुढे सुरुवात करण्याच्या इराद्याने उतरेल.

गोलंदाजी आणि ऑस्ट्रेलियन आव्हान

कॅनबेरामध्ये भारताला गोलंदाजीची संधी मिळाली नाही; परंतु या विभागात त्यांच्याकडे जसप्रीत बुमराहचा दर्जा आणि वरुण चक्रवर्तीचे कौशल्य आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यासारख्या गोलंदाजांमुळे संघाची गोलंदाजी अधिक प्रभावी झाली आहे, जी फलंदाज अपयशी ठरल्यास कमी धावसंख्येचा बचावही करू शकते. तरीही, मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या आक्रमक फलंदाजांविरुद्ध आव्हान अर्थातच तगडे असणार आहे.

संभाव्य संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीशकुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन बॉट (पहिले 3 सामने), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (शेवटचे 3 सामने), टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश हेझलवूड (पहिले 2 सामने), ग्लेन मॅक्सवेल (शेवटचे 3 सामने), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस.

  • सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दु. 1.45 वा.

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्‌‍ नेटवर्क

  • लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार

हेड टू हेड

  • सामने : 32

  • भारत विजयी : 20

  • ऑस्ट्रेलिया विजयी : 11

  • निकाल नाही : 1

ऑस्ट्रेलियाचाही आक्रमक खेळाचा साचा

ऑस्ट्रेलियाचा टी-20 खेळण्याचा साचा भारतीय संघाप्रमाणेच आहे. यात सामन्याच्या परिस्थितीची पर्वा न करता आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर दिला जातो. हेड, मार्श, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड आणि जोश इंग्लिस यांच्यासारख्या खेळाडूंमुळे ते मोठी धावसंख्या उभारण्यास किंवा अवघड आव्हानांचा पाठलाग करण्यास सक्षम आहेत. मिचेल स्टार्कच्या टी-20 मधून निवृत्तीमुळे आणि पॅट कमिन्स दुखापतीतून सावरत असल्याने, त्यांची गोलंदाजी अनुभवाने थोडी कमकुवत दिसत आहे. झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन एलिस यांचा समावेश असलेल्या गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता हेझलवूडवर आहे.

गंभीरचा ‌‘हाय-रिस्क, हाय-रिवॉर्ड‌’ दृष्टिकोन

दुसऱ्या सामन्यापूर्वी, भारतीय संघासाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे सूर्यकुमारचे फॉर्मात परतणे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी लागू केलेल्या ‌‘हाय रिस्क, हाय रिवॉर्ड‌’ या दृष्टिकोनासह संघ विश्वचषकाच्या मार्गावर आगेकूच करत आहे. गंभीरला आपला संघ 20 षटकांच्या लढतीत सातत्याने 250, 260 पेक्षा जास्त धावा करताना पाहायचे आहे आणि असे करताना संघ काही वेळा 120-130 धावांवर सर्वबाद झाला किंवा काही सामने गमावले, तरी त्यांना त्याची हरकत नसेल, असे सध्याचे बदलते चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT