इंदूर; वृत्तसंस्था : सलग दोन पराभवांमुळे दडपणाखाली असलेल्या भारतीय संघाला, रविवारी येथे होणार्या इंग्लंडविरुद्धच्या महिला वन डे विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण सामन्यात आपला खेळ उंचावणे क्रमप्राप्त असणार आहे. यापूर्वी, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या सलग पराभवांमुळे भारताच्या मोहिमेत मोठा अडथळा निर्माण झाला असून संघाच्या रणनीतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजची लढत दुपारी 3 पासून खेळवली जाईल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी ‘विमेन इन ब्लू’ संघाला आता उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकणे अनिवार्य आहे, ज्यामुळे संघ ‘करा किंवा मरा’च्या स्थितीत आहे.
पाच फलंदाज, एक यष्टिरक्षक आणि 3 अष्टपैलूंसह 5 गोलंदाज ही भारताची या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतची रणनीती राहिली आहे. मात्र, या रणनीतीच्या मर्यादा स्पष्टपणे उघड झाल्याने संघ व्यवस्थापनाला पुनर्विचार करण्यास भाग पडले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या रूपात फलंदाजीतील खोलीच्या मोहापायी भारताने वेगवान गोलंदाज रेणुका सिंगसारख्या एका प्रमुख बळी घेणार्या गोलंदाजाला अमनजोत कौरसाठी संघाबाहेर बसवले आहे. रेणुकाच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी काहीशी एकसुरी झाली आहे. तिच्या समावेशामुळे गोलंदाजीला आवश्यक असलेली विविधता मिळू शकते असा होरा आहे.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतीका रावळ, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड.
इंग्लंड : नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), एम अलॉट, टॅमी ब्यूमॉन्ट, लॉरेन बेल, लिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फिलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, हिदर नाइट, एम्मा लँब, लिन्से स्मिथ, डॅनी वॅट-हॉज.