नवी दिल्ली; वृत्तसंस्था : यजमान भारताने दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपला पहिला डाव 5 बाद 518 धावांवर घोषित केल्यानंतर दुसर्या दिवसअखेरपर्यंत विंडीज संघाची चांगलीच भंबेरी उडाली. विंडीजला शनिवारी 4 बाद 140 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. त्यामुळे दिवसअखेर वेस्ट इंडिज संघ अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहे. हा संघ यासह सलग दुसर्यांदा मोठ्या पराभवाच्या छायेत असल्याचे सुस्पष्ट झाले आहे.
फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा (3/37) आणि कुलदीप यादव (1/45) यांनी प्रतिस्पर्ध्यांची आघाडी फळी कापून काढत सामन्यावर वर्चस्व राखले. या दोघांनी मिळून पाहुण्यांचे चार गडी बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शाई होप (नाबाद 31) आणि टेविन इमलॅच (14) नाबाद राहिले.
तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल (258 चेंडूंत 175) आणि कर्णधार शुभमन गिल (196 चेंडूंत नाबाद 129) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. त्यांच्या भागीदारीमुळे भारताला सामन्यात वरचष्मा मिळाला असून, आता तिसर्या दिवशी विंडीजचे उर्वरित फलंदाज शक्य तितक्या लवकर बाद करत ही पकड आणखी मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.
वेस्ट इंडिजने थोडाफार प्रतिकार करत 32 षटकांत 3 गडी गमावताना 114 धावा जोडल्या. ते अजूनही 378 धावांनी पिछाडीवर असले तरी, या डावातील प्रतिकार त्यांच्यासाठी सकारात्मक ठरेल का, हे पाहावे लागेल. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असली तरी भारतीय संघ विंडीजला रोखण्यात सहज यशस्वी होईल, हे जवळपास निश्चित होते. मुळातच विंडीजची फलंदाजी फारशी दखलपात्र नसल्याने या लढतीत भारत आणखी किती कालावधीत विजय मिळवणार, इतकीच आता उत्सुकता असणार आहे.
5 शुभमन गिलसाठी 2025 वर्षातील हे पाचवे शतक ठरले. कर्णधार या नात्याने सुरुवात केल्यानंतर एकाच वर्षात सर्वोच्च शतकांचा देखील हा विक्रम आहे. याशिवाय, कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 5 शतके झळकावण्याच्या विराटच्या विक्रमाशी शुभमनने बरोबरी साधली. विराटने यापूर्वी 2017 व 2018 या सलग दोन वर्षांत प्रत्येकी 5 क सोटी शतके झळकावली होती.
84.81 कसोटी क्रिकेटमध्ये किमान 7 वेळा संघाचे नेतृत्व भूषवत गिलची आतापर्यंतची फलंदाजीतील सरासरी 84.81 इतकी लक्षवेधी ठरली आहे. या निकषावर तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या पाठोपाठ दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या 7 कसोटीतील नेतृत्वानंतर ब्रॅडमन यांची सरासरी 101.51 इतकी होती.