Twitter
स्पोर्ट्स

टीम इंडियाने केला ऑस्ट्रेलियाचा सुपडासाफ, 30 वर्षांपूर्वी विक्रम काढला मोडीत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या अंडर-19 संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 7 धावांनी पराभव करत रोमांचक विजयाची नोंद केली. यासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत कांगारू संघाचा क्लीन स्वीप करून 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. भारताने पहिला सामना 7 गडी राखून आणि दुसरा सामना 9 विकेट्स राखून जिंकला होता. तिस-या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना 324 धावा केल्या, परंतु लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला निर्धारित 50 षटकात केवळ 317 धावा करता आल्या.

पुद्दुचेरीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 324 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघानेही उत्कृष्ट प्रदर्शन केले. पण त्यांना 50 षटकांत 7 गडी गमावून केवळ 317 धावांपर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. साहिल पारख आणि रुद्र पटेल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी झाली. 20 च्या वैयक्तिक धावसंख्येवर साहिल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रुद्रला हरवंशची साथ मिळाली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली. हरवंश 46 धावा करून बाद झाला. रुद्रने 77 धावा केल्या. याशिवाय कर्णधार मोहम्मद अमानच्या बॅटमधून 71 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी हार्दिक राजने 18 चेंडूत 30 धावा केल्या तर चेतन शर्माने 9 चेंडूत 18 धावांची नाबाद खेळी केली. कांगारू संघाकडून एडन ओ'कॉनरने सर्वाधिक 4 बळी घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने 324 धावांपर्यंत मजल मारली.

स्टीव्हन होगन-ऑलिव्हर पीकची शतके

ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी खेळली. मात्र तरीही कांगारू संघाला विजयासाठी आवश्यक असलेल्या 325 धावांचा पाठलाग करता आला नाही. कर्णधार ऑलिव्हर पीकने 115 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली तर स्टीव्हन होगनने 84 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. भारताकडून हार्दिक राजने 3 तर किरण चोरमले आणि युधजीत गुहा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

या सामन्यात एकूण 641 धावा झाल्या. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 एकदिवसीय सामन्यातील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. या सामन्याने 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला आहे. 1994 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघादरम्यान झालेल्या सामन्यात एकूण 588 धावा झाल्या होत्या.

अननच्या सर्वाधिक विकेट, साहिलच्या सर्वाधिक धावा

तीन सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. मोहम्मद अननने सर्वाधिक 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय किरण चोरमले आणि हार्दिक राज यांनीही प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय साहिल पारखने फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने या मालिकेत एकूण 133 धावा केल्या. यात एका शतकी खेळीचाही समावेश आहे. आता 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान चेन्नई येथे दोन्ही संघांमध्ये चार दिवसीय पहिला अनऑफिशियल कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT