पर्थ : भारताविरुद्ध रविवारी (19 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे ऑलराउंडर कॅमेरॉन ग्रीन मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मार्नस लाबुशेनची संघात निवड करण्यात आली आहे.
ग्रीनला बाजूच्या स्नायूमध्ये वेदना असल्यामुळे निवड समितीने ऍशेस मालिकेच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता त्याला विश्रांती दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रीन एक छोटी पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करेल आणि ऍशेसपूर्व तयारीसाठी शेफील्ड शिल्डच्या तिसऱ्या फेरीत तो परतण्याची शक्यता आहे.
लाबुशेन मूळ संघात नव्हता, मात्र गुरुवारी क्वीन्सलँडकडून शेफील्ड शिल्डमध्ये खेळताना त्याने केलेल्या 159 धावांच्या खेळीमुळे त्याची निवड झाली. हा त्याचा हंगामातील चौथा शतक आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघात तीन खेळाडू बदलावे लागले आहेत.
जखमी जोश इंग्लिसऐवजी जोश फिलिपला संघात घेतले आहे. ॲडम झॅम्पा वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळणार नसल्याने त्याच्या जागी मॅथ्यू कुन्हेमनला संधी मिळणार आहे. भारताच्या दृष्टीने, अनेकांचे लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या पुनरागमनाकडे असेल. टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते प्रथमच आंतरराष्ट्रीय रंगमंचावर दिसतील.
मिचेल मार्श (कर्णधार), झेविअर बार्टलेट, कूपर कॉनॉली, बेन द्वार्शुईस, नॅथन एलिस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुन्हेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क.दुसऱ्या पासून सहभागी:ॲडम झॅम्पा, ॲलेक्स केरी, जोश इंग्लिस.