बंगळूर; वृत्तसंस्था : पुनरागमन करणार्या ऋषभ पंतच्या 17 धावांच्या निराशाजनक खेळीमुळे भारत ‘अ’ संघ पहिल्या डावात 234 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा ऑफ स्पिनर प्रेनेलन सुब्रायनच्या (61 धावांत 5 बळी) प्रभावी गोलंदाजीमुळे पाहुण्या संघाला 75 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी, दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघ 309 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने आपला डाव सुरू केला.
तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या ऋषभ पंतने यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी केली, पण फलंदाजीत तो अपयशी ठरला. पंतने आपल्या 17 धावांच्या खेळीत दोन चांगले चौकार मारले, पण एका अनिर्णीत शॉटमुळे तो गल्लीत उभ्या असलेल्या जुबायर हमजाकडे सोपा झेल देऊन बाद झाला. भारताच्या फलंदाजांमध्ये केवळ युवा आयुष म्हात्रेनेच संघर्ष केला. त्याने 76 चेंडूंत 65 धावांची संयमी खेळी केली. त्याने साई सुदर्शनसोबत (94 चेंडूंत 38 धावा) पहिल्या विकेटसाठी 90 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिकेचा ऑफ स्पिनर प्रेनेलन सुब्रायन (61 धावांत 5 बळी) भारतासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने सातत्याने गोलंदाजी करत चेंडूला मिळणार्या थोड्या टर्नचा आणि विषम उसळीचा पुरेपूर फायदा घेतला आणि भारताच्या फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने दुसर्या डावात दिवसअखेर बिनबाद 30 धावा केल्या आहेत आणि त्यांची एकूण आघाडी आता 105 धावांवर पोहोचली आहे. जॉर्डन हरमन (12) आणि लेसेगो सेनोक्वाने (9) खेळपट्टीवर आहेत.