रोहित शर्मा आणि विराट कोहली File Photo
स्पोर्ट्स

ICC कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ! विराट, रोहितचे मोठे नुकसान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज विराट कोहली यांनी निराशा केली. ते सामन्याच्या दोन्ही डावांत स्वस्तात बाद झाले. या खराब कामगिरीचा त्यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. विराट कोहली टॉप 10 मधून बाहेर पडला आहे, तर रोहित शर्माची दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा सलामी फलंदाज यशस्वी जैस्वालने झेप घेतली आहे. तर शुभमन गिल यालाही फायदा झाला आहे.

रूट पहिल्या तर विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर

आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप 4 च्या फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा जो रूट अजूनही अव्वल स्थानी आहे. त्याचे रेटिंग सध्या 899 आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन (852 रेटिंग) दुसऱ्या, तर डॅरिल मिशेल (760 रेटिंग) तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे रेटिंग 757 असून तो चौथ्या स्थानी आहे.

जैस्वालला एका स्थानाचा फायदा

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल एका स्थानाने पुढे सरकला आहे. त्याने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये एन्टृई घेतली आहे. त्याचे रेटिंग 751 झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. याचा त्याला फायदा झाला आहे. तर भारताचा ऋषभ पंत 731 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा (728 रेटिंग) सातव्या, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन हे दोघे 720 रेटिंगसह संयुक्तरित्या आठव्या क्रमांकावर आहेत.

विराट टॉप 10 मधून बाहेर

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एका झटक्यात 5 स्थानांचे नुकसान झाले आहे. त्याचे रेटिंग आता 716 पर्यंत घसरले असून तो थेट दहाव्या स्थानावर पोहचला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचेही पाच स्थानांचे नुकसान झाले आहे. तो आता 709 च्या रेटिंगसह 12 व्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम हा विराटच्या पुढे 11 व्या स्थानावर आहे. बाबरचे रेटिंग 712 आहे. दरम्यान, शुभमन गिल यालाही थोडा फायदा झाला आहे. ते 701 रेटिंगसह 5 स्थानांची झेप घेत 14 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT