पणजी : फिडे विश्वचषकाच्या पहिल्या फेरीच्या दुसर्या गेममधून रविवारी महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख बाहेर पडली. ग्रीक ग्रँडमास्टर स्टॅमॅटिस कौरकौलोस-आर्डिटिसकडून सलग दुसर्या पराभवामुळे आणि हा नॉकआऊट खेळ असल्यामुळे तिला हार पत्करावी लागली.
या विश्वचषकात 206 खेळाडूंमध्ये दिव्या ही एकमेव महिला खेळाडू होती. शनिवारी पहिल्या फेरीतील पहिला गेम दिव्याने पांढर्या मोहर्यांनी गमावला होता. त्यामुळे रविवारीचा सामना टाय-ब्रेकमध्ये जाण्यासाठी तिच्यासाठी जिंकणे आवश्यक होते. मात्र, ग्रीक ग्रँडमास्टरने सुरुवात केल्यानंतर, पहिल्या 23 चालींसाठी फक्त एकच प्यादे बोर्डाबाहेर होते.
रविवारच्या पहिल्या फेरीचा दुसरा खेळ दिव्यासाठी ‘करो वा मरो, असाच होता. यात विजयाची आवश्यकता होती. तिच्या प्रतिस्पर्ध्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवली. उत्कृष्ट खेळीद्वारे दिव्याचा पराभव केला. दिव्या व्यतिरिक्त, घरच्या मैदानावर खेळणारा खेळाडू लिओन ल्यूक मेंडोंका याचा चीनच्या आंतरराष्ट्रीय मास्टर शिक्सू बी वांगकडून पराभव झाला. दुसर्या फेरीत वर्ल्ड चॅम्पियन गुकेश डी, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगाईसी, विदित गुजराती यांच्यासह सर्व अव्वल भारतीय खेळाडू मैदानात उतरतील.
पहिल्या फेरीच्या दुसर्या गेममध्ये रौनक साधवानी, ग्रँडमास्टर सूर्यशेखर गांगुली, कार्तिक वेंकटरमण यांनी विजय प्राप्त करून दुसरी फेरी गाठली, तर आंतरराष्ट्रीय आरण्यक घोषने प्रतिस्पर्धी बार्टेलचा पराभव करून टायब्रेक फेरी गाठली.