पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी (दि.14) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. जागतिक क्रिकेट संघटनेने गेल्या वेळेच्या तुलनेत या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ५३ टक्क्यांनी वाढ केली आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९.५ कोटी रुपये मिळणार आहेत.
ही आयसीसी स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित केली आहे. भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, त्यानंतर आयसीसीने भारताचे सामने दुबईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपली मोहीम सुरू करेल. या स्पर्धेसाठी भारताचा गट अ मध्ये समावेश आहे ज्यामध्ये गतविजेता पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचाही समावेश आहे.
विजेत्या संघाव्यतिरिक्त, उपविजेत्या संघाला $१.१२ दशलक्ष (सुमारे ९.७२ कोटी रुपये) मिळतील, तर उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या दोन्ही संघांना $५६००० (४.८६ कोटी रुपये) मिळतील. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) झाली आहे. "मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम ही खेळात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या स्पर्धांची जागतिक प्रतिष्ठा राखण्यासाठी आयसीसीची वचनबद्धता अधोरेखित करते," असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघांना $३४,००० (३० लाख रुपये) मिळतील. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना $350,000 (सुमारे 3 कोटी रुपये) मिळतील, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना $140,000 (सुमारे 1.2 कोटी रुपये) मिळतील. याशिवाय, या आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना $१२५००० (सुमारे १.०८ रुपये) कोटींची रक्कम दिली जाईल.
भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला लीग स्टेज सामना खेळेल. यानंतर, २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाला सात दिवसांची विश्रांती मिळेल. यानंतर, भारतीय संघ २ मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करेल. भारताने शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकला होता, तेव्हा महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. २००२ मध्ये पावसामुळे अंतिम सामना रद्द करण्यात आला. तेव्हा भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते होते. भारतीय संघ एकूण चार वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०१३ आणि २००२ व्यतिरिक्त, हे २००० आणि २०१७ मध्ये घडले.